15 ऑगस्टनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार -- प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

15 ऑगस्टनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार -- प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक | प्रतिनिधी
आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, आज नाशिकमध्ये झालेल्या मेळाव्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट निवडणुकीची संभाव्य तारीख जाहीर करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.

कार्यकर्त्यांनी आता मैदानात उतरून प्रत्यक्ष काम करावे, केवळ नेत्यांपाठोपाठ फिरून तिकीट मिळणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. चमकोगिरीला बाय-बाय म्हणत, मतदारांमध्ये विश्वास निर्माण करणे हेच खरे राजकारण असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

भाजपच्या शासनाने गेल्या 11 वर्षांत घेतलेले निर्णय आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेला विकास जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपने कार्यशाळा घेतली. याच कार्यशाळेत बावनकुळे यांनी 15 ऑगस्टनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचा उल्लेख करत महत्त्वपूर्ण राजकीय संकेत दिला.

त्याचवेळी गिरीश महाजन यांनी भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोश भरत, “100 प्लस” चा नारा दिला. युती झाली तर ठीकच, पण न झाल्यास भाजप स्वबळावर लढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गटबाजी थांबवून सर्वांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

सूत्रसंचालनादरम्यान गिरीश महाजन यांचा संभाव्य पालकमंत्री म्हणून उल्लेख होणे, हे या मेळाव्याचे आणखी एक चर्चेचा विषय ठरले.