जिल्हा परिषद नाशिकची नूतन प्रशासकीय इमारत – आधुनिकता, हरितदृष्टी आणि लोकाभिमुखतेचा संगम

जिल्हा परिषद नाशिकची नूतन प्रशासकीय इमारत – आधुनिकता, हरितदृष्टी आणि लोकाभिमुखतेचा संगम

नाशिक : त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेली जिल्हा परिषद नाशिकची नूतन प्रशासकीय इमारत आता उद्घाटनासाठी सज्ज झाली आहे. अत्याधुनिक, सुसज्ज, हरित आणि नागरिकाभिमुख रचनेमुळे ही इमारत जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेला आणि नागरिक सेवेच्या गुणवत्तेला नवी दिशा देणार आहे. तंत्रज्ञान, सोयीसुविधा आणि पर्यावरणपूरकतेचा सुंदर संगम असलेली ही इमारत ‘मिनी मंत्रालय’ ठरेल, अशी प्रशासकीय व नागरिकांची अपेक्षा आहे.

ही नवी इमारत जिल्हा परिषदेच्या प्रगतिशील दृष्टिकोनाचे प्रतिक आहे. शाश्वत विकास, ऊर्जा बचत, सुरक्षा आणि सोयी या सर्व बाबींचा विचार करून बांधकाम करण्यात आले आहे. या इमारतीत सर्व विभागांसाठी सुलभ, सुरक्षित आणि आरामदायी कार्यालयीन वातावरण उपलब्ध झाले असून, कर्मचारी व नागरिक दोघांसाठीही ही सुविधा उपयोगी ठरणार आहे.

जिल्हा परिषदेची जुनी इमारत ही नाशिक जिल्हा लोकल बोर्डाची मूळ इमारत १९५१ साली पूर्ण झाली, तर जिल्हा परिषदेची स्थापना १ मे १९६२ रोजी झाली. त्यानंतर वाढत्या कामकाजानुसार इमारतीस वाढीव बांधकाम करण्यात आले. २०११ साली मागील बाजूस नवीन इमारत उभारली गेली, मात्र प्रशासकीय विभागांचा विस्तार आणि वाढत्या सेवांची गरज लक्षात घेता, स्वतंत्र प्रशासकीय संकुलाची आवश्यकता भासू लागली. या पार्श्वभूमीवर नव्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे.

नूतन इमारतीची ठळक वैशिष्ट्ये:

हरित इमारत : ऊर्जासक्षम बांधकाम, पुरेसा नैसर्गिक प्रकाश व खेळती हवा, तसेच छतावर सोलर सिस्टीम बसविल्यामुळे वीज खर्च शून्याच्या जवळ जाणार आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग व एस.टी.पी. प्रणाली : जलसंवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना.

स्वतंत्र ग्रंथालय : अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अध्ययन, संशोधन आणि संदर्भासाठी सुविधा.

हिरकणी कक्ष : महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र, सुरक्षित व आरामदायी विश्रांतीगृह.

बहुउद्देशीय सभागृह आणि सर्वसाधारण सभा हॉल : परिषद, प्रशिक्षण, बैठका आणि कार्यक्रमांसाठी आधुनिक सुविधा असलेले सभागृह.

मनोरंजन कक्ष : कर्मचाऱ्यांसाठी मानसिक ताणमुक्ती आणि विश्रांतीसाठी विशेष व्यवस्था.

उपहारगृह (कॅन्टीन) : स्वच्छ, सुव्यवस्थित आणि प्रशस्त भोजनाची सोय.

अॅम्फीथिएटरयुक्त प्रांगण व कोर्टयार्ड : सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकसहभाग उपक्रमांसाठी 900 आसनक्षमतेची जागा.

पार्किंग सुविधा : 125 चारचाकी आणि 500 दुचाकी वाहनांसाठी प्रशस्त जागा.

सुरक्षा यंत्रणा : संपूर्ण इमारतीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे आधुनिक सुरक्षा व्यवस्था.

प्राथमिक उपचार केंद्र : आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी तत्पर सुविधा.

सहा कॉन्फरन्स हॉल, 300 क्षमतेचा मल्टीपर्पज हॉल आणि 130 क्षमतेचा सर्वसाधारण सभा हॉल.

प्रत्येक मजल्यावर 8 ते 12 फूट रुंदीचा पॅसेज, चार लिफ्ट आणि पाच जिन्यांची व्यवस्था.

सार्वजनिक सुविधा केंद्र, बँक कार्यालये, दिव्यांग कक्ष, अभिलेख कक्ष, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूम यांसारख्या सुविधा या इमारतीला अधिक सक्षम बनवतात.

ही नवी प्रशासकीय इमारत एकात्मिक प्रशासन, लोकाभिमुखता आणि पर्यावरणपूरक शासनकार्याचे प्रतीक ठरत असून, नाशिक जिल्ह्याच्या विकासयात्रेत एक महत्वाचा टप्पा गाठल्याचे प्रतिक आहे.