प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजना पुन्हा सुरु – नाशिक महानगरपालिकेचे आवाहन

नाशिक (प्रतिनिधी) : पथविक्रेत्यांसाठी सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजना पुन्हा सुरु झाली असून, नुकत्याच केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेचा कालावधी मार्च 2030 पर्यंत वाढविण्यास मंजुरी दिली आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून आजवर ३८,८४० पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. योजना अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र शासनाने काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत.
योजनेतील महत्वाच्या सुधारणा
-
कर्ज मर्यादा वाढ : पहिल्या हप्त्यातील कर्ज ₹10,000 वरून ₹15,000, तर दुसऱ्या हप्त्यातील कर्ज ₹20,000 वरून ₹25,000 करण्यात आले आहे.
-
रुपे क्रेडिट कार्ड सुविधा : दुसरे कर्ज पूर्ण फेडल्यानंतर लाभार्थ्यांना त्वरित नवीन कर्जासाठी रुपे क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे.
-
डिजिटल व्यवहारांवर कॅशबॅक : किरकोळ व घाऊक व्यवहारांवर लाभार्थ्यांना ₹1,600 पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.
-
‘स्वनिधी ते समृद्धी’ उपक्रम : पथविक्रेते आणि त्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारच्या ८ कल्याणकारी योजनांशी जोडले जाते.
अर्ज कसा कराल?
पथविक्रेत्यांनी आपल्या जवळच्या CSC (ग्राहक सेवा केंद्र) किंवा आपले सरकार केंद्रात जाऊन पीएम स्वनिधी योजनेसाठी अर्ज भरावा.
पूर्वी लाभ घेतलेल्या पथविक्रेत्यांसाठी
लाभार्थ्यांनी सामाजिक-आर्थिक प्रोफाइलिंगसाठी नाशिक महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयातील NULM कक्षात भेट देऊन माहिती भरावी.
नाशिक महानगरपालिकेच्या उपआयुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी सौ. सुवर्णा दखणे यांनी आवाहन केले आहे की,
???? “जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे जावे.”
???? अधिक माहितीसाठी : नाशिक मनपाच्या संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.