प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांच्या पाच चरित्र पुस्तकांचे प्रकाशन....

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांच्या  पाच चरित्र पुस्तकांचे प्रकाशन....
प्राचार्य राम कुलकर्णी यांच्या ५ पुस्तकांचे प्रकाशन करताना गोखले एज्युकेशन संस्थेच्या सचिव प्राचार्या डॉ. सौ., दीप्ती देशपांडे, अध्यक्ष डॉ. आर. पी. देशपांडे, विंग कमांडर आनंद आगाशे व लेखक डॉ. राम कुलकर्णी ई. दिसत आहेत

नाशिक :-        गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी  तसेच प्रा. सौ. नीता कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ५ पुस्तकांचे प्रकाशन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते नुकतेच एका कार्यक्रमात समारंभपूर्वक करण्यात आले. 

        याप्रसंगी व्यासपीठावर संस्था सचिव डॉ. सौ. दीप्ती देशपांडे, अध्यक्ष डॉ. आर. पी. देशपांडे तर प्रमुख अतिथी विंग कमांडर आनंद आगाशे, लेखक डॉ. राम कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. पुस्तकांविषयी मनोगत व्यक्त करताना डॉ. राम कुलकर्णी यांनी शालेय विद्यार्थ्यांवर योग्य वयामध्ये जीवन मूल्यांचे संस्कार होण्यासाठी या चरित्र पुस्तकांचे लेखन केल्याचे प्रतिपादन केले. यात भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल, महर्षी अण्णासाहेब कर्वे, लोकमाता अहिल्यादेवी होळकर तसेच महापराक्रमी योद्धा नेपोलियन बोनापार्ट व अब्राहम लिंकन या पाच पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. आजवर डॉ. राम कुलकर्णी यांनी  ९३ पुस्तकांचे लेखन केले असून त्यांच्या शतक महोत्सवी पुस्तकांचे प्रकाशन लवकरच करण्यात येईल असे सांगितले. याप्रसंगी डॉ. दीप्ती देशपांडे यांनी  डॉ. राम कुलकर्णी यांच्या लेखन कार्यास शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासास नक्कीच उपयोगी होईल अशी सदिच्छा व्यक्त केली.