के व्ही एन नाईक सिन्नर महाविद्यालयात निर्भयकन्या अभियान कार्यशाळेचे आयोजन

के व्ही एन नाईक सिन्नर महाविद्यालयात निर्भयकन्या अभियान कार्यशाळेचे आयोजन

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे बुधवार दि.25/02/2026 व गुरुवार दि.26/02/2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत दोन दिवसीय निर्भय कन्या अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दि. 25 फेब्रुवारी रोजी या कार्यशाळेचे उद्घाटन सत्र संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्राची नावंदर (BAMS आयुर्वेद, श्रद्धा हॉस्पिटल) या उपस्थित होत्या. संस्थेचे संचालक श्री समाधान गायकवाड यांनी अध्यक्षस्थान भूषवले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी आपल्या मनोगतातून या कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला. डॉ. प्राची नावंदर यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानांमधून विद्यार्थिनींना तरुण वयात वाढत असणाऱ्या पीसीओडी, सर्वाइकल व बेस्ट कॅन्सर यासारख्या समस्यांची कारणे व यांना आळा घालण्यासाठी मोबाईलचा अतिवापर टाळणे, योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप, तणावमुक्त आयुष्यासाठी योग्य दिनचर्या याविषयी सुयोग्य असे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थिनींच्या विविध शंकांचे निरसन देखील केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतामधून श्री समाधान गायकवाड यांनी देखील विद्यार्थिनींनी तरुण वयामध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. ज्योती गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन रूपाली गोळेसर व आभार प्रदर्शन गायत्री रसाळ या विद्यार्थिनींनी केले.

दि. 26 फेब्रुवारी रोजी या कार्यशाळेच्या द्वितीय सत्रामध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी तायक्वांदो प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री नितीन सानप (टेक्निकल डायरेक्टर तायक्वांदो नासिक डिस्ट्रिक) हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे विश्वस्त मा श्री नामदेवराव काकड यांनी भूषवले. यावेळी संस्थेचे संचालक मा श्री समाधान गायकवाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपल्या मनोगतातून संस्थेचे संचालक श्री समाधान गायकवाड यांनी विद्यार्थिनींनी केवळ प्रशिक्षण घेऊन उपयोग नाही तर त्याचा नियमित सराव देखील करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून संस्थेचे विश्वस्त श्री नामदेव काकड यांनी विद्यार्थिनींना या प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी तायक्वांदो प्रशिक्षक श्री नितीन सानप व त्यांच्या टीमने विद्यार्थिनींना वेगवेगळे प्रात्यक्षिके करून दाखवले व विद्यार्थिनींना देखील या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी करून प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेमध्ये वरिष्ठ विभागातील एकूण 100 विद्यार्थिनी सहभागी झाल्या. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. व विद्यार्थिनींसाठी दोन्ही दिवशी चहापान व अल्पोआहाराचे आयोजन करण्यात आले.

द्वितीय सत्र कार्यशाळा कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी केले तर सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. ज्योती गायकवाड यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख स.प्रा. पुनम कुटे यांनी व्यक्त केले.

या कार्यशाळेच्या दोन्ही सत्रासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते.