'नाशिक ते नासा’ – ग्रामीण विद्यार्थ्यांची ऐतिहासिक झेप
आयआयटीत निवड झालेले सहा विद्यार्थी जाणार नासा व अमेरिका अभ्यास दौऱ्यावर
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सुपर ५० उपक्रमाच्या माध्यमातून आयआयटीत प्रवेश मिळवलेल्या सहा ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट अमेरिकेतील नासा (National Aeronautics and Space Administration) या जागतिक संशोधन व अंतराळ संस्थेला तसेच अमेरिकेतील विविध शैक्षणिक व संशोधन संस्थांना भेट देण्याची संधी मिळाली आहे.
हा दौरा संपूर्ण आठवडाभर चालणार असून, विद्यार्थ्यांना नासाबरोबरच अमेरिकेतील अन्य प्रतिष्ठित विज्ञान-तंत्रज्ञान संस्था, संशोधन प्रयोगशाळा आणि विद्यापीठांना प्रत्यक्ष भेट देण्याचा अनुभव मिळणार आहे. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक होईल आणि जागतिक ज्ञानाशी त्यांची थेट नाळ जुळेल. या दौऱ्यात विद्यार्थ्यांसोबत जिल्हा परिषदेतील एक शिक्षकही सहभागी होणार असून त्यांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे जागतिक शैक्षणिक व संशोधन प्रवासाचा थेट अनुभव विद्यार्थांना घेता येणार आहे. ‘सुपर 50’ प्रकल्पाची सुरुवात माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून झाली. या प्रकल्पातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना JEE व NEET सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण, दर्जेदार कोचिंग, मार्गदर्शन व सर्व सुविधा पुरवल्या जातात. हाच उपक्रम पुढे नेत आता मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार विद्यार्थ्यांना थेट नासात पाठवण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे आयआयटी प्रवेश मिळालेल्या सहा विद्यार्थ्यांना आता थेट नासा अमेरिकेतील प्रतिष्ठित संस्था बघण्याची संधी उपलब्ध होणार आहे, यातून जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांना देखील प्रेरणा मिळणार आहे.
“ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना जागतिक पंख देण्यासाठीच ‘नाशिक ते नासा’ ही संकल्पना राबवली आहे. सुपर ५० उपक्रमातून आयआयटी सारख्या संस्थेत निवड झालेल्या हा कार्यक्रम दरवर्षी सातत्याने राबवला जाईल. विद्यार्थ्यांना अमेरिकेत जाऊन विज्ञान-तंत्रज्ञानाचा थेट अनुभव घेता येईल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते मोठी स्वप्ने पाहून ती प्रत्यक्षात उतरवतील. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीही जागतिक दर्जाचे यश मिळवू शकतात हे या उपक्रमातून सिध्द होईल.” - ओमकार पवार , मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नाशिक