समाजशील व्यक्तिमत्त्व : डॉ. राजेंद्र जाधव

समाजशील व्यक्तिमत्त्व : डॉ. राजेंद्र जाधव

नाशिकरोड येथील प्रसिद्ध सर्जन आणि नाशिकरोड प्रभाग समितीचे माजी सभापती डॉ. राजेंद्र रामचंद्र जाधव यांचा १५ मार्च २०२६ रोजी ६५ वा वाढदिवस साजरा होत आहे. या निमित्ताने त्यांच्या वैद्यकीय आणि सामाजिक कार्याचा आढावा घेणे म्हणजे समाजसेवेच्या एका प्रेरणादायी प्रवासाचीच कहाणी आहे.

“सेवा जशी आईची माया” हे ब्रीद घेऊन गेल्या सुमारे ४० वर्षांपासून नाशिकरोड पंचक्रोशीत जाधव हॉस्पिटलच्या माध्यमातून अहोरात्र वैद्यकीय सेवा देणारे डॉ. राजेंद्र जाधव हे बहुआयामी आणि समाजशील व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. त्यांचा जन्म १५ मार्च १९६१ रोजी भगूर येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र धनाजी जाधव आणि मातोश्री अनुसया जाधव यांच्या कुटुंबात झाला. त्यांनी पुणे येथील बी.जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस तसेच केईएम हॉस्पिटल, पुणे येथून एम.एस.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नाशिकरोड येथील पाटणकर क्लिनिक येथे त्यांनी स्वतंत्र वैद्यकीय सेवेला सुरुवात केली.

अल्पावधीतच सर्वसामान्य परिस्थितीतील गरजू रुग्णांवर उपचार करणारे सेवाभावी डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती निर्माण झाली. नाशिक महानगरपालिकेचे बिटको हॉस्पिटल, आयएसपी हॉस्पिटल, बिर्ला हॉस्पिटल, कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल तसेच महापालिकेची विविध रुग्णालये आणि भगूर नगरपालिका अशा अनेक शासकीय व निमशासकीय रुग्णालयांत त्यांनी मोफत वैद्यकीय सेवा देत आपले कर्तव्य बजावले.

३१ मे १९९७ रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या हस्ते जगताप मळा परिसरातील आनंदनगर येथे उभारलेल्या सर्वसुविधायुक्त जाधव हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. त्यामुळे दुर्धर आजारांवरील उपचार आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया एकाच ठिकाणी शक्य झाल्या. अनेकदा देशातील विविध रुग्णालयांनी उपचारांना असमर्थता दर्शवलेल्या रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार करून त्यांना नवजीवन दिले आहे.

१९९७ मध्ये नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर तसेच १९९९ मध्ये नाशिकरोड प्रभाग समितीचे सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी विविध विकासकामे राबवून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे समाजसेवक म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली.

कोरोना महामारीच्या काळात त्यांनी स्वतःकडे असलेले ऑक्सिजन सिलेंडर गरजू रुग्णांना सर्वप्रथम उपलब्ध करून दिले. आजही ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची पर्वा न करता ते रुग्णसेवेत तत्पर असतात. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सहजतेने करणारे आणि सहकारी डॉक्टरांना अडचणीच्या वेळी मदत करणारे डॉक्टर म्हणून पंचक्रोशीत त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

डॉ. जाधव यांच्या वाटचालीत त्यांच्या पत्नी डॉ. माधुरी जाधव यांची मोलाची साथ लाभली आहे. त्यांचे मोठे चिरंजीव डॉ. सुशांत जाधव (अस्थिरोगतज्ज्ञ) आणि सून डॉ. तेजस्विनी जाधव वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून धाकटे चिरंजीव इंजि. ऋषिकेश परदेशात कार्यरत आहेत. संपूर्ण जाधव कुटुंब सेवाभावी वैद्यकीय परंपरा पुढे नेत आहे.

वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. क्रीडा क्षेत्राची विशेष आवड जोपासत त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.

नाशिकरोड सोशल कल्चरल असोसिएशन, लायन्स क्लब, इंडियन मेडिकल असोसिएशन, मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, शेवगेदारणा शिक्षण मंडळ, व्यक्तिविकास मंच, नाशिक सर्जन असोसिएशन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, वीर सावरकर प्रतिष्ठान आणि ऋतुरंग परिवार अशा अनेक संस्थांमध्ये त्यांनी कार्य केले आहे. १९९० मध्ये परिवार नियोजनावर त्यांनी प्रबंध लेखन केले असून नाशिक, दिल्ली, इंदोर, मुंबई आणि अहिल्यानगर येथे झालेल्या वैद्यकीय चर्चासत्रांत त्यांनी सहभाग घेतला आहे.

कविवर्य कुसुमाग्रज, ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांसारख्या अनेक मान्यवरांशी त्यांचे स्नेहबंध आहेत. कुसुमाग्रजांच्या हस्ते हॉस्पिटलचा शुभारंभ आणि चांदवड तालुक्यातील बहादुरी येथील विमान अपघातात जखमी झालेल्या ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांच्यावर उपचार करण्याची संधी या त्यांच्या आयुष्यातील संस्मरणीय घटना ठरल्या.

रुग्णांवर माफक दरात आणि सेवाभावी वृत्तीने उपचार करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारे डॉ. राजेंद्र जाधव हे वैद्यकीय सेवेतील एक दीपस्तंभ आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच शुभेच्छा.