नोकिया स्मार्टपूर वार्षिक सादरीकरण कार्यशाळा उत्साहात पार

नाशिक | १८ जुलै २०२५ :
REACHA संस्था व Nokia CSR यांच्या संयुक्त विद्यमाने “स्मार्टपूर प्रभाव आणि अंतर्दृष्टी : वार्षिक सादरीकरण व क्षमता बांधणी कार्यशाळा” नाशिक येथील हॉटेल किरीयाडमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेचे आयोजन स्मार्टपूर प्रकल्पाच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेणे, सहभागी संस्था व व्यक्तींची क्षमता वाढवणे तसेच शासन, स्वयंसेवी संस्था, बँका आणि ग्रामीण समुदायातील नेतृत्व यांच्यात समन्वय वाढवणे या प्रमुख उद्देशाने करण्यात आले होते.
सध्या स्मार्टपूर प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सिन्नर या तीन तालुक्यांतील एकूण २० गावांमध्ये यशस्वीरित्या राबवला जात आहे. हा प्रकल्प शिक्षण, शासकीय सेवा, वित्तीय समावेशन, उपजिविका व आरोग्य या पाच महत्त्वाच्या क्षेत्रांवर काम करतो.
कार्यशाळेत एकूण ६५ सहभागी उपस्थित होते. त्यामध्ये शासकीय अधिकारी, संस्थात्मक प्रतिनिधी, ग्रामविकास अधिकारी, स्मार्टपूर समिती सदस्य, लाभार्थी आणि केंद्र चालकांचा समावेश होता. सप्टेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीतील प्रगती, यशोगाथा, आव्हाने, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि ग्रामीण भागातील सकारात्मक बदल यावर सखोल चर्चा झाली.
कार्यशाळेची सुरुवात राज्य प्रकल्प प्रमुख श्री. हरीश वैद्य यांच्या सादरीकरणाने झाली. त्यांनी REACHA संस्थेचा १९९२ पासूनचा प्रवास उलगडला. संस्थेची स्थापना, विविध राज्यांतील कार्यक्षेत्र, विविध शासकीय आणि खाजगी भागीदार संस्था यांच्या सहकार्याने राबवले जाणारे उपक्रम यांचे विवेचन केले. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील २० गावांमध्ये स्मार्टपूर प्रकल्पातून होत असलेले डिजिटल सशक्तीकरण, महिला सक्षमीकरण, उपजिविकेच्या संधी यावर सविस्तर माहिती दिली.
कार्यशाळेत सहभागी लाभार्थ्यांनी त्यांच्या यशोगाथा थेट अधिकाऱ्यांसमोर मांडल्या, त्यांना योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात मार्गदर्शन मिळाले. या वेळी केंद्रचालक व सामुदायिक संस्थांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यशाळेस खालील मान्यवर उपस्थित होते :
-
डॉ. प्रशांत धर्माधिकारी – जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन विभाग
-
श्री. विजय रिसे – सहायक आयुक्त, कौशल्य विकास विभाग
-
श्री. सागर भाबड – अधिकारी, कौशल्य विकास विभाग
-
श्री. अशोक पवार – कायदेशीर सल्लागार, महिला व बालकल्याण विभाग
-
कु. पी. ए. काळगे – विस्तार अधिकारी, पंचायत समिती, सिन्नर
-
सौ. अनुराधा लोढे – वित्तीय सल्लागार, बँक ऑफ महाराष्ट्र
-
श्री. समीर कुलकर्णी – मास्टर ट्रेनर, RSETI
-
तसेच सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर येथील ११ ग्रामविकास अधिकारी
कार्यशाळेच्या शेवटी उपस्थितांनी स्थानिक स्वराज्य संस्था, शासन यंत्रणा आणि REACHA संस्थेमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून ग्रामीण भागातील शेवटच्या नागरिकांपर्यंत सेवा व संधी पोहोचवण्याचा निर्धार केला.
REACHA संस्थेची माहिती :
REACHA ही संस्था सन १९९२ मध्ये श्री. जे. सी. पंत (IAS, सेवानिवृत्त १९६१) यांच्या संकल्पनेतून स्थापन झाली. शिक्षण, आरोग्य, उपजिविका, पर्यावरण आणि सुशासन या क्षेत्रांमध्ये संस्था गेली तीन दशके कार्यरत आहे. भारतातील विविध राज्यांत REACHA संस्था शासन, कॉर्पोरेट कंपन्या व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने विविध प्रकल्प राबवते. नाशिक जिल्ह्यातील २० गावांमध्ये नोकिया स्मार्टपूर प्रकल्प यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे.
कार्यशाळेच्या माध्यमातून वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेऊन भविष्यातील उपक्रमांची दिशा निश्चित करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागातील डिजिटल परिवर्तन, महिला सक्षमीकरण आणि उपजिविका संधी निर्माण करण्यासाठी पुढील काळात अधिक प्रभावी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.