महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. आनंदराव अडसूळ यांनी घेतला जिल्हा परिषदेचा आढावा

नाशिक : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग, मुंबई चे अध्यक्ष मा. श्री. आनंदराव अडसूळ (मंत्री दर्जा) व सदस्य मा. श्री. गोरक्ष लोखंडे (सचिव दर्जा) यांनी दि. ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती कक्षात आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीच्या प्रारंभी जिल्हा परिषद नाशिकच्यावतीने मा. अध्यक्ष व सदस्य यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ते निर्देशही देण्यात आले.
बैठकीत विशेषतः घर घर तिरंगा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या अनुषंगाने आढावा घेतला, जिल्हा परिषदेने या उपक्रमात ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग सुनिश्चित करून, देशभक्ती आणि एकात्मतेचा संदेश घराघरांत पोहोचविण्यात यावा, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
तसेच लाड पागे प्रकरणांबाबत जिल्ह्यातील स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित प्रकरणांवरील तक्रारींचे निपटारे जलद गतीने करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश आयोगाच्या अध्यक्षांनी दिले. मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या विविध योजनांबाबतही चर्चा होऊन त्यातील प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढण्याबाबत प्रशासनाला सूचना करण्यात आल्या.
जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखांनी आपापल्या कामकाजाचा अहवाल सादर केला. मा. अध्यक्षांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून, अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांना शासनाच्या सर्व योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि कार्यक्षमतेने काम करावे, असे आवाहन केले.
या प्रसंगी मा. जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) महेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) डॉ वर्षा फडोळ, जिल्हा समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर कनोज, शिक्षणाधिकारी माध्यमिक सरोज जगताप, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने आदि विभागप्रमुख उपस्थित होते.