नाशिक जि.प.नवचेतना अभियानांतर्गत राज्यातील पहिला एकल महिला पुनर्विवाह परिचय मेळावा

नाशिक जि.प.नवचेतना अभियानांतर्गत राज्यातील पहिला एकल महिला पुनर्विवाह परिचय मेळावा

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने राज्यातील पहिल्यांदाच एकल महिलांच्या पुनर्विवाहासाठी सर्व जातीय, मोफत वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या नवचेतना अभियानाच्या माध्यमातून एकल महिलांच्या सामाजिक, मानसिक व आर्थिक पुनर्वसनाला चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत जिल्हा परिषद बहुउद्देशीय सभागृहात हा मेळावा संपन्न होणार आहे. पुनर्विवाहासाठी इच्छुक असलेल्या एकल महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी पवार यांनी केले. या उपक्रमासाठी नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत.

पदवीधर व उच्चशिक्षित नोकरदार पुरुष उमेदवारांना प्राधान्य -

या मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी पुरुष उपवरांनी इच्छुकांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे,  यासाठी पुरुष उपवर हा पदवीधर व उच्चशिक्षित असल्यास प्राधान्य तसेच त्यांनी त्यांची कार्यक्रमापूर्वी नाव नोंदणी करणे बंधनकारक असेल नाव नोंदणी केलेल्या पुरुषांना पास दिला जाणार असून पास शिवाय पुरुषांना प्रवेश मिळणार नाही, त्याचसोबत ओळखीचा व नाव नोंदणीचा पुरावा (पास) सोबत आणणे आवश्यक असेल.

नावनोंदणीसाठी संपर्क:- 8453902222, 7447785910 या क्रमांकावर संपर्क करावा. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून इच्छुक वधू-वर सहभागी होणार असून, जे युवक विधवा किंवा घटस्फोटित महिलेसोबत विवाहासाठी तयार असतील, त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

विधवा पुनर्विवाह चळवळीचा इतिहास :

शतकापूर्वी, जेव्हा समाजात विधवांना आधार देणारे कोणी नव्हते, तेव्हा महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी १८६३ मध्ये ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू करून त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून दिला. त्यांनी माणुसकीची आणि कृतीशीलतेची ज्योत पेटवली.

याच विचारांना पुढे नेत, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी १८९३ मध्ये समाजाचा तीव्र विरोध पत्करून एका विधवेशी विवाह करण्याचा मोठा निर्णय घेतला त्यांनी स्व-उदाहरण देऊन दाखवून दिले की, समाजातील बदल हा कृतीनेच घडतो.

यानंतर सुमारे मारे १०० वर्षांपूर्वीची गोष्ट... कोल्हापूर संस्थानाचे राजे ‘राजर्षी शाहू महाराज’ यांनी एक क्रांतीकारी पाऊल उचलले. २५ जुलै १९१७ रोजी त्यांनी आपल्या संस्थानात ‘विधवा पुनर्विवाहाचा कायदा’ संमत केला. एक राजा केवळ गादीवर बसून राज्य करत नाही, तर तो आपल्या रयतेच्या लेकीबाळींच्या डोळ्यातील अश्रू पुसतो, हे शाहू महाराजांनी सिद्ध केले. ते केवळ कायदा करून थांबले नाहीत, तर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन विधवा विवाह लावून दिले आणि त्या जोडप्यांचा सन्मान केला.

शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन आज नाशिक जिल्हा परिषद ‘नवचेतना अभियान’ राबवत आहे. ज्या मातीवर महात्मा फुले आणि महर्षी कर्वेंचे संस्कार आहेत, तिथे एकाही भगिनीला एकाकी आयुष्य जगण्याची वेळ येऊ नये. हा लढा जुनाच आहे, फक्त माध्यम नवीन आहे. हा केवळ एक मेळावा नाही, तर ही एक सामाजिक चळवळ आहे. या चळवळीत आपणही सहभागी व्हा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले.