तरुप्रीत प्रकल्पाच्या माध्यमातून सिन्नर तालुक्यात गुळवंच येथे वृक्षारोपण

सिन्नर | प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या तरुप्रीत प्रकल्पाच्या माध्यमातून दिनांक १६ जुलै २०२५ रोजी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील प्रतिष्ठित शेतकरी सौ. नीता एकनाथ सानप यांच्या शेतात "रोपटे आमचे, अंगण तुमचे" या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी डॉ. मंगल सांगळे व प्रियांका केदार यांनी पेरूच्या झाडांची लागवड करत निसर्ग संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश दिला. “जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक वृक्षारोपण व बीजारोपण ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन डॉ. सांगळे यांनी केले.
तर प्रियांका केदार म्हणाल्या, “ओसाड माळरान हिरवेगार करण्यासाठी आम्ही तरुप्रीत प्रकल्पांतर्गत अविरत कार्य करत आहोत आणि यापुढेही हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचा मानस आहे.”
दरवर्षी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण संकल्पनांद्वारे पर्यावरणपूरक काम करणाऱ्या तरुप्रीत प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत २०,००० हून अधिक बीजारोपण आणि १,००० हून अधिक वृक्षारोपण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या दोघी मैत्रिणी स्वतःच्या वर्षभरातील बचतीतून हा उपक्रम राबवतात, ही बाब नक्कीच प्रेरणादायक आहे.