मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे नाशिक जिल्हास्तरीय शुभारंभ

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे नाशिक  जिल्हास्तरीय शुभारंभ

नाशिक : महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत राष्ट्रनेता मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे स्मरण करून राज्यभर “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे मा. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, मा. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीतीत दुरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला. नाशिक  जिल्हास्तरीय शुभारंभ नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायत पिंप्री सैय्यद येथे राज्याचे मा. जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन, मा. आमदार सरोज अहिरे, मा. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) डॉ. वर्षा फडोळ, गट विकास अधिकारी डॉ. सोनिया नाकाडे, ग्रामपंचायत पिंप्री सैय्यदचे सरपंच भाऊसाहेब ढिकले, ग्रामपंचायत अधिकारी दौलत गांगूर्डे उपस्थित होते.

 “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत ग्रामपंचायतींना शाश्वत विकासासाठी सक्षम करणे, नागरिकांच्या सहभागातून पारदर्शक अंमलबजावणी साध्य करणे आणि ग्रामपंचायतींचे प्रशासन अधिक कार्यक्षम बनविणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. या अभियानात गाव विकास आराखड्याची निर्मिती, निधीचा परिणामकारक वापर, गाव स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, शैक्षणिक उन्नती व डिजिटल पंचायत या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात येणार असून नाशिक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामस्थ यांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. आमदार सरोज अहिरे यांनी गावाचा विकास करतांना पर्यावरणपूरक बाबींचा विचार करावा, नैसर्गिक साधनसंपत्तीची वाढ कशा प्रकारे करता येईल याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही ग्रामपंचायतींच्या सर्वंकष विकासाची ही निकोप स्पर्धा आहे, त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी अभियानाच्या अनुषंगाने मा. जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले तसेच लाभार्थ्यांना आयुष्यमान गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले. पोषण आहार सप्ताह राबवून महिलांच्या व बालकांच्या पोषणाविषयी जनजागृती करण्यात आली. स्वस्थ-नारी सशक्त परिवार या कार्यक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात आली. याचबरोबर ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळाचे अनावरण करून डिजिटल पंचायत संकल्पनेची सुरुवात झाली, तर ‘स्वच्छता ही सेवा’ या विशेष उपक्रमाचा शुभारंभ करून ग्रामस्वच्छतेचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

ग्रामपंचायत दाभाडी, मालेगाव येथे राज्याचे मा. शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ केला, लोकसहभागातुन अभियान यशस्वी करत प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावात नावीन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात, शालेय विद्यार्थ्यांना देखील या अभियानात सहभागी करून जनजागृती करावी व सर्व शासकीय योजनांच्या अभिसारणातून गावात विकासकामे करावी असे त्यांनी आवाहन केले, यावेळी स्वच्छता ही सेवा याबाबत शपथ देखील घेण्यात आली.

संपूर्ण जिल्ह्यात लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या उपस्थितीत शुभारंभ : जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषद तालुका संपर्क अधिकारी यांच्या उपस्थितीत “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.