प्रत्येक ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास हाच उद्देश – मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार

प्रत्येक ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास हाच उद्देश – मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार

मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाच्या पूर्व तयारीचा आढावा

दिंडोरी : “गावागावांतील ग्रामपंचायती सक्षम व समृद्ध झाल्या तरच खरी अर्थाने राज्याचा विकास साध्य होईल. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे ग्रामीण भागातील शासकीय सेवा बळकट करण्यासाठी आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाइट अद्ययावत करणे, योजनांची पारदर्शक अंमलबजावणी करणे आणि लोकसहभागातून कामे उभी करणे हे आपले सामूहिक ध्येय असले पाहिजे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले.

पवार यांनी दिंडोरी पंचायत समितीला भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा सविस्तर आढावा घेतला तालुकास्तरीय कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत “स्वनिधी व लोकवर्गणीच्या माध्यमातून आर्थिक सक्षम पंचायत उभारणे, स्वच्छता व जलसंवर्धनावर भर देणे, हरित व ऊर्जा-बचत उपाययोजना राबवणे, तसेच सुशासनयुक्त पंचायत घडवणे हे अभियानाचे मूळ उद्दिष्ट आहे. या कामांसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक नागरिकाला सहभागी करून घ्यावे अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी खडकसुकेणे येथील ग्रामपंचायत अधिकारी मनोहर गांगूर्डे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानंतर्गत तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीचे सादरीकरण केले या वेबसाइटच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावरील सर्व शासकीय सुविधांचे डिजिटलायझेशन करण्यात आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी याबद्दल कौतुक करत इतर ग्रामपंचायतींनी देखील आदर्श घेत आपले लोकाभिमुख संकेतस्थळ निर्माण करावे असे प्रतिपादन केले. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे, सहायक गट विकास अधिकारी भरत वेंदे यांच्यासह तालुकास्तरावरील विभागप्रमुख अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “समृद्ध ग्रामपंचायत घडवण्यासाठी शासन योजनांचे अभिसरण महत्त्वाचे आहे. सुशासनयुक्त पंचायत निर्माण करण्यासाठी पारदर्शकता, लोकसहभाग आणि जबाबदारी ही तीन तत्त्वे अत्यावश्यक आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत अधिकारी आपल्या गावाचे सादरीकरण करताना या मुद्द्यांवर ठोस कृती आराखडा सादर करावा,” असे आवाहन त्यांनी केले. 

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी अभियानातील उद्दिष्टपूर्तीकडे लक्ष वेधले, “या अभियानात ग्रामविकासाशी निगडीत प्रत्येक बाबीवर गुणांकन होते. त्यामुळे प्रत्येक योजनेची उद्दिष्टपूर्तता आवश्यक आहे. विशेषतः घरकुल योजना टप्पा १ व टप्पा २ मधील उद्दिष्टे गाठणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण जनतेच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, महिला स्वयंसहाय्यता समूह्यांच्या मदतीने अभियानात गावाचे गुणांकण वाढवावे” असे त्यांनी सांगितले.

स्वयंसहाय्यता समूह प्रकल्पांना भेट

मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनीवनारवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील नवनाथ महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या मशरूम निर्मिती प्रकल्पाला भेट दिली व मशरूम निर्मितीच्या प्रक्रियेची माहिती घेतली. तसेच ढकांबे ग्रामपंचायत येथील सर्वज्ञ महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या कारली व बटाटा वेफर्स निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केले. “महिला बचतगटांनी राबविलेल्या उद्योगांना प्रशासन व समाजाने बळ दिले, तर हे उपक्रम ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला नवा चेहरा देतील,” असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.

प्राथमिक आरोग्य केंद्र भेट

मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दौऱ्यादरम्यान तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन औषधसाठा, लसीकरण कक्षाची कार्यपद्धती व रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा याची पाहणी केली. त्याचबरोबर स्वस्थ नारी निरोगी परिवार उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत निहाय लसीकरण करावे अशा सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी दिल्या.