मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्याकडून निफाड येथील पूर परिस्थितीची पाहणी

नाशिक : निफाड तालुक्यातील पूरपरिस्थितीची आज दि. २८ सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ वाजता जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात सिन्नरमार्गे त्यांनी ग्रामपंचायत सायखेडा व ग्रामपंचायत चांदोरी येथे भेट देऊन पूरग्रस्त कुटुंबांची चौकशी केली. स्थलांतरित कुटुंबांना त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व प्रशासनामार्फत तातडीने आवश्यक ती मदत व सुविधांची उपलब्धता करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तसेच नागरिकांनी देखील घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन केले.
यावेळी त्यांनी चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही भेट देऊन आरोग्य सेवा आणि औषधोपचाराच्या उपलब्धतेची माहिती घेतली. पूरपरिस्थितीत नागरिकांच्या आरोग्य सेवेस कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांनी आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.
या पाहणी दौऱ्यात निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नम्रता जगताप, ग्रामपंचायत चांदोरी येथील सरपंच भाऊसाहेब खरात, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश भांबारे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.