“स्वावलंबी नाशिक” UDID मोहीम – नाशिक पंचायत समितीत २५७ दिव्यांगांची नोंदणी पात्र

“स्वावलंबी नाशिक” UDID मोहीम – नाशिक पंचायत समितीत २५७ दिव्यांगांची नोंदणी पात्र

जिल्हा परिषद नाशिकतर्फे राबविण्यात येणाऱ्या “स्वावलंबी नाशिक” अभियानांतर्गत नाशिक पंचायत समिती येथे आज आयोजित केलेल्या UDID विशेष शिबिराला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात २५७ दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन पोर्टलवरील UDID नोंदणीसाठी पात्र ठरविण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा उद्देश जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला त्यांच्या तालुक्याच्या पातळीवरच वैद्यकीय तपासणी, निदान आणि UDID कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांगत्वासाठी प्रमाणपत्र अनिवार्य आहे. मात्र प्रमाणपत्र उशिरा मिळाल्यास अनेकांना शासकीय लाभांपासून वंचित राहावे लागते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व तालुक्यांत विशेष शिबिरांद्वारे जलद व सुलभ प्रक्रियेची अंमलबजावणी केली आहे.

आज नाशिक पंचायत समितीत आयोजित शिबिरात जिल्हा रुग्णालय येथील तज्ञ डॉक्टर्सनी दिव्यांग लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करून UDID कार्ड प्रक्रियेची पुढील पायरी पूर्ण करण्यात आली. नोंदणीपासून डेटा अपलोडपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया एकाच ठिकाणी, एका दिवसात पूर्ण केल्याने दिव्यांगांना मोठी सुविधा झाली.

शिबिराचे नियोजन पंचायत समिती नाशिक तसेच दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. अधिकारी आणि सहाय्यक कर्मचारी यांच्यातील सुसंवादामुळे शिबिर निर्विघ्न पार पडले. उपक्रमाचे मार्गदर्शन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी केले. यावेळी गट विकास अधिकारी डॉ. सोनिया नाकाडे यांच्यासह पंचायत समितीस्तरीय विभागप्रमुख, दिव्यांग नागरिक उपस्थित होते.