नाशिक रोड मधील लोकमान्य टिळक पुतळ्याची दयनीय अवस्था; मद्यपींचा अड्डा आणि कचऱ्याचे साम्राज्य!

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक रोड रेल्वे स्थानकासमोरील थोर राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. नाशिक शहरातील हा एकमेव टिळक पुतळा असूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. पुतळा परिसर सध्या मद्यपी आणि असामाजिक प्रवृत्तींसाठी सुरक्षित ठिकाण बनत चालला आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी या परिसरात मद्यपी खुलेआम मद्यपान करतात, आरडाओरड करतात आणि परिसरात गोंधळ घालतात. महिलांसाठी आणि कुटुंबांसाठी हा परिसर असुरक्षित ठरत आहे. परिसरात अंधार असल्याने, सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही नसल्याचा गैरफायदा घेतला जात आहे.
पुतळ्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे, पुतळ्याच्या रंगरंगोटीची गरज आहे तसेच दगडांना भेगा पडल्या आहेत. या थोर विचारवंताचे स्मारक उपेक्षित राहणे ही नाशिककरांसाठी लज्जास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
यासंदर्भात लोकमान्य टिळक उत्सव समिती व सामाजिक कार्यकर्त्यांनी नाशिक रोड विभागीय कार्यालयाकडे खालील मागण्या केल्या आहेतः
-
पुतळ्याची तातडीने दुरुस्ती व रंगरंगोटी करावी
-
परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी
-
परिसरात विद्युत रोषणाई व सीसीटीव्ही लावण्यात यावेत
-
परिसरात पोलिसांची नियमित गस्त ठेवावी
याप्रसंगी रोहन देशपांडे, संग्राम फडके, विशाल उपाध्याय, अनंत कुलकर्णी, अभिजीत कुलकर्णी, पंकज मिश्रा, कुशल वारे, अमोल पांडे, राजेंद्र वडनेरे, संतोष जोशी, प्रदीप देशपांडे, मंथन नाईक आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडले जाईल. “टिळक पुतळ्याचा सन्मान आणि परिसराची शुद्धी हे नाशिककरांचे कर्तव्य आहे,” असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.