अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा नाशिक महानगरपालिकेत दौरा संपन्न

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा नाशिक महानगरपालिकेत दौरा संपन्न

नाशिक महानगरपालिकेमध्ये आज महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा दौरा संपन्न झाला. आयोगाचे अध्यक्ष मा. नामदार आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनुसूचित जाती-जमातींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा आणि उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीच्या प्रारंभी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने  अध्यक्ष नामदार आनंदराव अडसूळ तसेच आयोगाचे सदस्य गोरख लोखंडे यांचे स्वागत महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त  प्रदीप चौधरी यांनी पुष्पगुच्छ व पुस्तिका देऊन केले.

यानंतर झालेल्या बैठकीत अनुसूचित जाती-जमातींसाठी नाशिक महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती  चौधरी यांनी आयोगासमोर सादर केली. त्यांनी सामाजिक न्याय विभागांतर्गत होत असलेल्या उपक्रमांचे तसेच शैक्षणिक, आर्थिक व कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा तपशील सादर केला.

बैठकीत आयोगाने प्रत्येक विभागाचा सखोल आढावा घेतला. यावेळी शासनाकडून समाजकल्याण विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. अनुसूचित जाती-जमातींवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, तसेच शासनाच्या निर्देशानुसार त्यांना योग्य तो न्याय आणि सुविधा मिळाव्यात, याबाबत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना  अध्यक्ष अडसूळ यांनी दिल्या.

यावेळी नाशिक महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पातथरूट, मुख्य लेखापरीक्षक बळवंत गायकवाड, उपआयुक्त अजित निकत, नितीन नेर, नितीन पवार, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता अविनाश धनाइत, रवींद्र धारणकर यांसह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीचे आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले.

अनुसूचित जाती-जमाती आयोगाने या बैठकीत शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्त केले तसेच नाशिक महानगरपालिकेकडून घेतल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक केले. आयोगाने पुढील काळात अनुसूचित जाती-जमातींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांवर अधिक लक्ष केंद्रीत करून जनजागृती वाढविण्याच्या आणि लाभार्थ्यांपर्यंत योजना प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीचा समारोप परस्पर संवाद आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून झाला. आयोगाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.