डॉ.शहाणे बंधूंच्या पुस्तकाचे मनपा उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर यांच्या हस्ते प्रकाशन

डॉ.शहाणे बंधूंच्या पुस्तकाचे मनपा उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर यांच्या हस्ते प्रकाशन

नाशिक ( प्रतिनिधी) एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांच्या वतीने तृतीय वर्ष कला या वर्गासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या “इंडस्ट्रीयल इकॉनॉमिक्स” या इंग्रजी माध्यमातील प्रा.डॉ. राजेंद्र शहाणे आणि प्रा.डॉ.कृष्णा शहाणे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन नाशिक महानगर पालिकेच्या नव नियुक्त उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर – शहाणे यांच्या हस्ते करण्यात आले. 

बिटको महाविद्यालय नाशिक रोड येथील प्रभारी प्राचार्य आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.कृष्णा शंकर शहाणे आणि त्यांचे बंधू बी.वाय.के. महाविद्यालयातील प्रा.डॉ. राजेंद्र शंकर शहाणे यांनी संयुक्तरीत्या लिहिलेल्या अर्थशास्त्रावरील 14 व्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. शहाणे बंधूंच्या ‘कमल’ या निवासस्थानी नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी विचार व्यक्त करतांना डॉ.नांदुरकर म्हणाल्या की, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांच्या वतीने डॉ. शहाणे बंधूंचे पुस्तक प्रसिद्ध झाले ही अभिनंदनिय बाब आहे. अर्थशास्त्र हा सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे. विशेषतः समाजामध्ये असणारी आर्थिक विषमता कमी होण्यासाठी अर्थशास्त्राचे विचार महत्वाचे आहेत. अर्थशास्त्र या विषयात कायम संशोधन होणे गरजेचे आहे त्यातून समाजाची प्रगती होण्यास मदत होईल. भारतीय आणि जागतिक उद्योग क्षेत्राचा मागोवा या पुस्तकातून अतिशय वास्तव रीतीने घेण्यात आलेला आहे. सदर पुस्तकातील विचार हे अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना, उद्योजकांना व विद्यार्थीवर्गाला निश्चितच मार्गदर्शक ठरतील, तसेच यापुढेही डॉ.शहाणे बंधूंच्या हातून आणखी लिखाण व्हावे यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

डॉ. विजय शहाणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, डॉ. शहाणे बंधूंचे अर्थशास्त्राचे लिखाण हे अर्थशास्त्राच्या अभ्यासकांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. अशाच प्रकारचे लिखाण करण्यात त्यांनी सातत्य ठेवावे असे त्यांनी शहाणे बंधूंना सांगितले. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात शंकर शहाणे यांनी पुस्तक लिखाणाच्या कार्याबद्दल अभिनंदन करून यापुढे अधिकाधिक दर्जेदार पुस्तकांचे लिखाण करण्यास शुभेच्छा दिल्या.    

याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. विजय शहाणे, श्री. शंकरराव शहाणे, सौ कमल शहाणे, प्रा.डॉ.कृष्णा शहाणे, प्रा.डॉ. राजेंद्र शहाणे, उपस्थित होते. यावेळी शंकरराव शहाणे यांनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले तर डॉ.कृष्णा शहाणे यांनी पुस्तक लेखनाची पार्श्वभूमी स्पष्ट केली.

सर्वप्रथम कार्यक्रमाच्या प्रारंभी उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर आणि डॉ. यांचा सत्कार शंकरराव शहाणे आणि सौ कमल शहाणे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तर पुस्तक प्रकाशनाबद्दल डॉ. शहाणे बंधूंचा सत्कार डॉ. नांदुरकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय व प्रस्तावना प्रा.राजेंद्र शहाणे यांनी केली, डॉ.सौ.जयश्री शहाणे यांनी सूत्रसंचालन केले तर सौ. विद्या शहाणे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.