नाशिकमध्ये विसर्जन मिरवणूक उत्साहात पार; सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अध्यक्ष श्री. समीर शेटे यांचे आभार प्रदर्शन

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरात यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात, भक्तीभाव व उत्साहात पार पडली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाच्या सरींमध्ये अधिक जल्लोषात हा सोहळा पार पडला. शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ नाशिकचे अध्यक्ष श्री. समीर शेटे यांनी या निमित्ताने सर्वांचे आभार मानले. त्यांनी म्हटले की, “विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष-उपाध्यक्ष व पदाधिकारी, नाशिक पोलीस आयुक्त, पोलीस प्रशासन, महानगरपालिका आयुक्त, अधिकारी-कर्मचारी, सफाई कर्मचारी वर्ग, लाईट विभाग कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा सोहळा यशस्वी झाला.”
गेल्या 11 दिवसांच्या गणेशोत्सव काळात तळागाळातील ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या मेहनतीचे विशेष कौतुक करत शेटे म्हणाले की, “संपूर्ण नाशिककरांचे सहकार्य अमूल्य आहे. पुढील वर्षीही याच सहकार्याने व मार्गदर्शनाने उत्सव अधिक उत्साहात पार पडेल.”