जिल्हा परिषदेच्या CSR बैठकीत औद्योगिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

जिल्हा परिषदेच्या CSR बैठकीत औद्योगिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

नाशिक : जिल्हा परिषद नाशिकच्या वतीने आज (दि. २५ सप्टेंबर २०२५) कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीच्या प्रभावी वापराबाबत विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील ३० औद्योगिक व व्यावसायिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ग्रामीण भागातील शाश्वत विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य, कृषी, महिला व बालकल्याण तसेच सामाजिक कल्याण क्षेत्रात औद्योगिक संस्थांचा सामाजिक दायित्व निधी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो, यावर बैठकीत एकमत व्यक्त करण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी “नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे. विकासकामे करताना अनेक औद्योगिक संस्था सामाजिक दायित्व निधीतून ग्रामीण भागाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या व्यासपीठावर एकत्र आल्या आहेत, याचे आम्हाला आनंद आहे. सामाजिक दायित्व निधीतून विकासकार्य करणाऱ्या प्रत्येक औद्योगिक संस्थांचे जिल्हा परिषद नेहमीच स्वागत करेल आणि त्यांना आवश्यक ती मदत करण्यात येईल असे प्रतिपादन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी पुढे औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींशी वैयक्तिक संवाद साधत त्यांच्या आवडीच्या कार्यक्षेत्राबद्दलची माहिती जाणून घेतली.

बैठकीदरम्यान शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी शिक्षण विभागातील विविध उपक्रम व गरजा याबद्दल माहिती दिली. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांनी आरोग्य विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या स्मार्ट PHC उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांनी मिशन कामधेनु, ई-पशू ॲप तसेच लसीकरण मोहिमेबाबत माहिती दिली. समाजकल्याण विभागाच्या वतीने जिल्हा समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांनी दिव्यांग शाळांच्या कार्यपद्धती व गरजा मांडल्या. कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांनी कृषी विभागातील रेशीम शेती उपक्रमाबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी CSR क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधींनी आपले विचार मांडले. Winjit Technology चे मकरंद सावरकर यांनी तंत्रज्ञानावर आधारित सामाजिक उपक्रमांची दिशा सांगितली. WNS कंपनीचे महेश गोसावी यांनी शिक्षण क्षेत्रातील CSR गुंतवणुकीची आवश्यकता अधोरेखित केली. बॉश कंपनीच्या वतीने दिपाली पवार यांनी कौशल्य विकास व महिला सक्षमीकरण या क्षेत्रातील सहभागाची भूमिका स्पष्ट केली. नवनीत फाऊंडेशनचे रॉनी श्रीवास्तव यांनी ग्रामीण शिक्षणासाठी नवकल्पनात्मक साधनसामग्री पुरविण्याबाबत विचार मांडले. तर गिव्ह संस्थाचे रमेश अय्यर यांनी सामाजिक उपक्रमांना संसाधन संकलनातून अधिक बळकटी देण्याचा दृष्टिकोन मांडला. जिल्हा परिषदेच्या व्यासपीठावरून ग्रामीण भागातील विकास उपक्रमांना CSR चा हातभार लाभून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वास या बैठकीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला. यावेळी भारतीय प्रशासन सेवा अधिकारी (परिवीक्षाधीन) सिद्धार्थ रामकुमार, अशोका शाळेचे व्यवस्थापकीय प्रमुख अपर्णा वाघ, मुख्याध्यापक रेणुका जोशी, अशोका ग्रुप सीएसआर प्रमुख व्योम श्रीवास्तव, मुख्यमंत्री फेलो विठ्ठल सोनूने, एलएफई संस्थेच्या वतीने शैलेश तवर,स्नेहल राजगुरू, सुमित शेंडे आदि उपस्थित होते.