मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय कक्ष स्थापन

नाशिक : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद नाशिकने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्हास्तरीय अभियान कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षाचे औपचारिक उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ उपस्थित होत्या.
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या अभियानात जिल्हा परिषद नाशिक आघाडीवर राहण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्नशील आहे, याचाच एक भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील १३८७ ग्रामपंचायतींना सातही घटकांच्या अनुषंगाने आवश्यक मार्गदर्शन, समन्वय व तांत्रिक सहाय्य मिळणार आहे.
अभियान कक्षाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीचा प्रगती अहवाल दर पंधरवड्याला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने वस्तुनिष्ठ अहवाल प्रणाली विकसित तयार केली असून, तिच्या माध्यमातून एका क्लिकवर सर्व ग्रामपंचायती आणि १५ पंचायत समित्यांची प्रगती पाहता येणार आहे. यामुळे कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गुणवत्तेत वाढ होणार आहे.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद नाशिकने यापूर्वीच विभागप्रमुखांची तालुका पालक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. हे पालक अधिकारी संबंधित तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा नियमित आढावा घेऊन निर्देशांकानुसार अभियानाच्या प्रगतीसाठी आढावा घेणार आहेत. जिल्हा परिषद अभियान कक्षामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तिन्ही स्तरांवर समन्वय वाढणार आहे.