बालकांचा आधार ठरलेल्या प्रणिता तपकिरे

Pranita-Tapkire-Personality-of-the-month , digitalnashik Childline helpline no 1098

बालकांचा आधार ठरलेल्या प्रणिता तपकिरे

जिव्हाळा, आपुलकी, काळजी ही शब्दांत असण्यापेक्षा ती कृतीतून व्यक्त होत असेल, तर ती खऱ्या अर्थाने सत्कारणी लागते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रणिता तुकाराम तपकिरे. बालविवाह, लैंगिक शोषण, बालकामगार, किशोरवयीन मुली निराधार आणि परित्यक्त्या महिला यांच्या पुनर्वसनासाठी प्रणिता तपकिरे काम करत आहे. नऊ वर्षांपासून चाइल्डलाइन १०९८ मध्ये कार्यरत आहेत. प्रणिता मूळच्या नाशिकच्या असून, त्यांनी मानसशास्त्रात पदवीनंतर एम. एस. डब्ल्यूचे शिक्षण घेतले आहे.

अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी नेहमीच त्या मदत करण्यास तयार असतात. त्यांनी बालविवाहाच्या अनेक तक्रारी सोडविल्या असून, त्यांच्या स्वतःच्या संकल्पनेतून बालविवाह प्रतिबंधासाठी नाशिक शहरातील लॉन्स आणि मंगल कार्यालयांमध्ये बालविवाह प्रतिबंध फलक लावण्यात आले आहेत. त्यावर बालविवाह कायद्यानुसार होणाऱ्या शिक्षा नमूद करण्यात आल्या आहेत. त्या नेहमीच लैंगिक शोषणाच्या केसेसमध्ये हस्तक्षेप करून नंतर पीडितांना मनोधैर्य योजनेचा लाभ देण्यासाठी तत्पर असतात. बालकामगारसारख्या प्रथेला आळा घालण्यासाठी जनजागृती करून शहरातील विविध हॉटेलमध्ये बालकामगार प्रतिबंध नियमांचे उल्लंघन तर होत नाही ना, याचा त्या आढावा घेत असतात. प्रणिता यांनी रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना ताब्यात घेण्याच्या अभियानात खास प्रयत्न केले होते. तसेच, त्या चाइल्डलाइन जनजागृती आणि बालकांचे लैंगिक शोषण यासंदर्भात मुलांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून शाळांमध्ये सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श याविषयी जनजागृतीचे काम करत आहेत. त्याचप्रमाणे, त्यांनी यापूर्वी सबला उपक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींना जीवन कौशल्य शिक्षण व स्वाधार योजनेंतर्गत निराधार आणि परितक्त्या महिलांच्या पुनर्वसनासाठीही कामे केली आहेत. माणुसकी हाच खरा धर्म आहे आणि शहराच्या प्रगतीसाठी सहानुभूती असून, चालत नाही, त्यासाठी कार्यदक्षही झाले पाहिजे, असे प्रणिता नेहमीच सगळ्यांना सांगतात.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

1) आपण सध्या कशा स्वरूपाच्या व्यावसायिक व सामाजिक कार्यात व्यस्त आहात?

- गेल्या 9 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. चाईल्डलाईन या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या प्रकल्पांतर्गत शहर समन्वयक म्हणून काम करत आहे. चाईल्डलाईन १०९८ ही काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलांसाठीची राष्ट्रीय २४ तास चालू असणारी, फोन केल्यास तातडीची मदत देणारी सेवा आहे. याअंतर्गत हरवलेली मुले, अत्याचारग्रस्त मुले,पळून गेलेली मुले,वेश्याव्यवसायासाठी आणलेली मुले,बालकामगार,बाल भिकारी,अनाथ-निराधार,वंचित अशा सर्व मुलांसाठी काम करते. चाईल्डलाईन वर आलेल्या कॉल वर दाखल झालेल्या प्रकरणा नुसार केसची पडताळणी केली जाते आणि मुलाला ज्या प्रकारच्या मदतीची गरज आहे त्या प्रकारची मदत केली जाते.

2) अशा प्रकारच्या व्यावसायिक व सामाजिक कामांची निवड करण्यामागील पृष्ठभूमी काय?

- समाजकार्याची पदवी घेतल्यानंतर समाजातील ज्वलंत प्रश्नांची जाणीव झाली आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपला हातभार लागेल या उद्दिष्टाने या क्षेत्रात काम करण्याची अभिरुची निर्माण झाली. किशोरवयीन मुलींसाठी, विधवा-परित्यक्ता महिलांसाठी आणि मेडिकल सोशल वर्कर म्हणून काम केल्यानंतर लहान मुलांसोबत काम करण्याची संधी मिळाली. मुळातच लहान मुलांची आवड असल्याने आवडत्या ग्रुप सोबत काम करायला मिळेल म्हणून हे काम स्वीकारले.

3) आपल्याला सद्यकामातून भविष्यात कोणते साध्य इच्छित आहे?

- गरजू लोकांना मदत करण्याची संधी मिळत राहावी. तसेच प्रत्येक मुलाला त्याच निरागस बालपण जगण्याचा अधिकार आहे त्याच्या साठी प्रयत्न करत राहणे.

4) आपल्या या जीवन प्रवासाची सुरुवात कशी झाली?

- के.टी. एच.एम महाविद्यालयातुन मानशास्त्रातून पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर पदवी घेण्याचा विचार करत असतानाच समाजकार्य पदवी बद्दल माहिती मिळाली. सहजच entrance दिली आणि माझे admission झाले. सुरुवातीला विविध सामाजिक संस्थांमध्ये Orientation visits करत असताना विविध समस्यांची जाणीव झाली. त्यामुळे Passout झाल्यानंतर याच क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.

5) आपल्याला एकंदरीत नाशिकच्या विकासासाठी व इथल्या युवकांच्या भविष्याविषयी काय वाटते?

- आजचा बालक उद्याच युवक आहे त्यामुळे आजच त्याच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याच्या हक्कांबद्दल जागरूक असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अर्थातच बालकांना बालकामगार, बालभिक्षेकरी, बाल लैंगिक शोषण, बाल विवाह यासारख्या समस्यांपासून सुरक्षित ठेवले पाहिजे.

6) आपल्या यशाचे रहस्य आपण कोणकोणत्या बाबींना द्याल?

- यश मग ते कोणाचेही असो कोणतेही असो या यशासाठी support महत्वाचा असतो. मला हे काम करण्यासाठी माझे आई वडील सौ.शकुंतला व श्री.तुकाराम यशवंत तपकिरे, माझे मार्गदर्शक प्रा.डॉ. विलास देशमुख, प्रा. सुनिता जगताप, माझे मित्र-मैत्रिणी आणि माझे सर्व चाईल्डलाईनचे सहकारी यांच्या support मुळे हे यश साध्य करता आले आहे.

7) आयुष्यात मार्ग शोधत असणाऱ्या नवोदित व्यावसायिक आणि युवकांना आपण काय संदेश/मार्गदर्शन देऊ इच्छितात?

- सामाजिक क्षेत्रात काम करत असताना संयम (Patience) महत्वाचा आहे. आज काम केले आणि लगेच यश मिळाले असे नाही. मोठा काळ तुम्हाला यासाठी द्यावा लागतो. तेव्हा संयम ठेवून आपले काम चांगल्या प्रकारे करत रहा यश नक्की मिळेल.