आजपासून शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाची टेकवारी -

मुंबई, दि. ४ : प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” दि. ५ ते ९ मे दरम्यान मंत्रालयात साजरा करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता(AI), ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा, कार्यशाळा व विचारमंथनाच्या प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या
अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवार दिनांक दि.५ मे २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ९ मे रोजी दुपारी ३.०० या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
‘टेक वारी’ म्हणजे महाराष्ट्र शासन आयोजित पहिली डिजिटल वारी होय. आधुनिक तंत्रज्ञान व नवीन कल्पनांचा संगम असून ‘टेक वारी’ ही मंत्रालयातून सुरू होऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञानाचा प्रसार करुन त्यामधून आधुनिक तंत्रस्नेही महाराष्ट्र घडविण्याची सुरुवात आहे. या ‘टेक वारी’ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा इत्यादी तंत्रज्ञानाबाबत सत्रे तसेच तणाव व्यवस्थापन, आरोग्यदायी जीवनशैली, ध्यानधारणा याबाबतच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. हे सर्व कार्यक्रम टेक वारीच्या https://www.youtube.com/@TECH-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80 या यू ट्यूब चॅनलवर तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक पेजवर (https://www.facebook.com/MahaDGIPR) पाहता येतील.
पहिल्या दिवशी दि. ५ मे रोजी मंत्रालयातील त्रिमुर्ती येथे ‘प्रभावी व तणावमुक्त जीवन’ या विषयावर श्री.प्रभु गौर गोपाल दास मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २:०० ते ३:०० या वेळेत मंत्रालयातील परिषद सभागृह, ६ वा मजला येथे “विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान” या विषयावर केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या श्रीमती देबजानी घोष यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत मंत्रालयातील समिती सभागृह (कक्ष ३), ७ वा मजला येथे”शासकीय कामकाज डिजिटल पद्धतीने कसे करावे” या विषयावर मायक्रोसॉफ्ट,नॅसकॉमचे श्री. मंदार कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ४:०० ते ५:०० या वेळेत मंत्रालयातील परिषद सभागृह, ६ वा मजला “कृत्रिम बुद्धिमत्ता” याविषयी नवी दिल्लीचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त सचिव अभिषेक सिंग यांचे व्याख्यान होणार आहे.