मराठा समाजातील लग्न समारंभातील खर्चावर आळा घालण्यासाठी नाशिकमध्ये संयुक्त पत्रकार परिषद

नाशिक – मराठा समाजातील वाढत्या विवाह खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने एमव्हीपी नाशिक येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.
या परिषदेत साखरपुडा, प्री-वेडिंग शूट, मेहंदी, हळद, संगीत, भव्य लग्न विधी, सत्कार समारंभ, DJ व महागड्या जेवणावळी यांसारख्या विवाहपूर्व आणि विवाहातील खर्चिक प्रथांमुळे वधूपित्यांवर आर्थिक बोजा वाढत असल्याची गंभीर नोंद घेण्यात आली.
कार्यक्रमात मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, प्रा. हरीश आडके, श्री. केशव अण्णा पाटील, चंद्रकांत बनकर, राजेंद्र शेळके, रमेश खापरे, आरुण पळसकर व भूषण काळे यांनी सहभाग घेत विवाह समारंभातील अशा अनिष्ट खर्चिक चालीरीतींवर खुली चर्चा केली.
यावेळी "साधेपणा आणि सामाजिक जबाबदारी" या मूल्यांचा पुनरुच्चार करत समाजामध्ये जनजागृती मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.