डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत शिक्षण व्यवस्था निर्माण होणे गरजेचे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत शिक्षण व्यवस्था निर्माण होणे गरजेचे
पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डॉ. वैशाली सूर्यवंशी, यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, बार्टीचे शुद्धोधन तायडे, मनोज पांडव, अविनाश शिरसाठ, राकेश बच्छाव ,उपप्राचार्य दिलीप माळोदे, प्रा संपत खैरनार, अजित देशमुख आदी.
पिंपळगाव बसंवत-  दि. ६ डिसेंबर २०२३ 
       डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचा मूलगामी विचार करणारे शिक्षण तज्ज्ञ होते. राष्ट्राच्या प्रगतीचा पाया शिक्षण आहे. शिक्षण प्रसाराची जबाबदारी शासनाची असून प्राथमिक शिक्षण हे गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्याचा विकास करणारे असावे. उच्च शिक्षण हे सामाजिक दायित्वाची भावना निर्माण करणारे असावे. माणसाला माणूस म्हणून जगण्याची जाणीव शिक्षणातून होते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत शिक्षण व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मातोश्री शिक्षणशास्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली सुर्यवंशी यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील क.का.वाघ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा  ढगे, बार्टीचे शुद्धोधन तायडे, मनोज पांडव, अविनाश शिरसाठ, राकेश बच्छाव, उपप्राचार्य दिलीप माळोदे, प्रा. संपत खैरनार, अजित देशमुख आदी उपस्थित होते.
सूर्यवंशी पुढे म्हणाल्या, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या जीवन मूल्यांसाठी बाबासाहेबांनी आपले आयुष्य समर्पित केले. तळागाळातील समाजाला प्रवाहामध्ये आणायचे असेल तर शिक्षण आणि त्यांच्या हक्काची जाणीव निर्माण करून दिली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजाबरोबर शेतकरी, मजूर, कामगार, युवक, महिला यांच्या हक्कासाठी लढा दिला. बाबासाहेबांनी स्त्री शिक्षणाचा हिरहिरीने पुरस्कार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षक प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थी प्रिय प्राध्यापक तसेच उत्तम अध्यापक संस्था चालक होते. त्यांनी आयुष्यभर ज्ञानाची कास धरली. ज्ञानवंत समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी लेखन केले असे विचार त्यांनी मांडले.
बार्टीचे समता दूत शुद्धोधन तायडे यांनी बार्टीच्या आर्थिक साह्य योजनेची माहिती दिली. बार्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केंद्रीय, राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेसाठी सहकार्य केले जाते. डॉ बाबासाहेबांचे विचार, कार्य भावी पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी ग्रंथरूपाने प्रसारित करण्याचे काम केले जाते. हे सांगून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीत दिलेले योगदान याचे अनेक दाखले विद्यार्थ्यांना दिले.
राकेश बच्छाव यांनी मनोगत व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर त्यांचे ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी असताना ज्याप्रमाणे अभ्यास करीत होते तसा अभ्यास, चिंतन विद्यार्थ्यांनी करावे असे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे म्हणाले की,  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रातून प्रेरणा मिळते. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात ते आदर्श विद्यार्थी होते.  त्यांच्या विचारांचे व कार्याचे आचरण विद्यार्थ्यांनी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसोयो कार्यक्रम अधिकारी प्रा. संपत खैरनार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शोभा डहाळे यांनी केले तर आभार अजित देशमुख यांनी मांडले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि विद्यार्थी विकास मंडळातील सर्व स्वयंसेवक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.