सायखेडा महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा...
म.वि.प्र. संस्थेचे श्री. स्वामी षट्कोपचार्यजी महाराज कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. खैरनार, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. गोसावी, डॉ. डी. डी. काजळे, सकाळ सत्र प्रमुख शशिकांत मोगल रा.स.यो. अधिकारी अभिन पोटे व इतर सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय राज्यघटनेचा सरनामा यांचे प्रतिमापूजन व संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले.
याप्रसंगी प्रा. अभिन पोटे यांनी भारतीय राज्यघटना हा आपल्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असून भारतीय राज्यघटना आपल्याला जीवन जगण्यासाठी प्रेरणा देते. राज्यघटनेद्वारे व्यक्तीला हक्क, कर्तव्ये, तत्वे या संदर्भात परिपूर्ण माहिती मिळते.
तसेच २९ऑगस्ट १९४७ रोजी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. अशी माहिती दिली या कार्यक्रम प्रसंगी २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबई वरती झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली