महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य प्रेरणादायी
पिंपळगाव बसवंत येथील क.का वाघ महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिन कार्यक्रमात डॉ. साहेबराव माळोदे यांचे प्रतिपादन
पिंपळगाव बसवंत २८.११.२०२३
देश पारतंत्र्यात आणि भारतीय समाज अज्ञानाच्या अंधकारमय वातावरणात वावरत असताना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेले समाज क्रांतिकारक कार्य विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे. त्यांनी मांडलेले विचार, केलेले लेखन, उभारलेल्या चळवळी यांचे सूक्ष्म अध्ययन करून त्यांचे विचार आत्मसात करणे काळाची गरजच आहे;असे मत अर्थशास्त्र विषयाचे माजी विभागप्रमुख उपप्राचार्य डॉ. साहेबराव माळोदे यांनी व्यक्त केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, प्रा. भगवान कडलग, प्रा. श्रीमती चित्रलेखा जोंधळे, डॉ. साहेबराव मोरे, डॉ. उपेंद्र पठाडे, प्रा. नारायण शिंदे, प्रा.राजेंद्र जाधव प्रा. अमोल मेहदळे आदी उपस्थित होते.
डॉ. साहेबराव माळोदे पुढे म्हणाले की, महात्मा फुले यांनी स्त्री मुक्तीसाठी लढा उभारला, सावित्रीबाई फुले यांना त्यांनी शिक्षण देऊन शिक्षित केले. विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध गृहांची स्थापना केली. सत्यशोधक समाज स्थापन करून सत्यशोधकीय विचार मांडले. महात्मा फुले यांचे साहित्य आजच्या तरुणांनी संशोधक वृत्तीने अभ्यासावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे म्हणाले की, महात्मा फुले यांनी सामाजातील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले. समाजात समता, न्याय, हक्क, शेतकऱ्यांसाठी लढा, तसेच शिक्षणात क्रांती घडविण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे. आपल्या लेखणीतून त्यांनी समाजातील अनिष्ट चालीरीतींवर परखड भाष्य केले. तरुणांनी व्यसनापासून दूर राहून पुस्तकांचे वाचन करावे असे विचार त्यांनी रुजविली. आजच्या तरुणांनीदेखील मनोरंजनाच्या साधनाचा वापर मर्यादित करून साहित्याचे वाचन वाढवावे. साहित्यचं आपल्याला समृद्ध करू शकते असे विचार मांडले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नारायण शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र जाधव यांनी केले तर प्रा.भगवान कडलग यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. महेश वाघ, डॉ. निलेश आहेर, प्रा. संदीप पगार, प्रा. धनंजय देशमुख, प्रा. पंकजकुमार गांगुर्डे तसेच महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
फोटो ओळ:-
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करताना डॉ. साहेबराव माळोदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, प्रा. भगवान कडलग, प्रा.श्रीमती चित्रलेखा जोंधळे, डॉ. साहेबराव मोरे, डॉ. उपेंद्र पठाडे, प्रा. नारायण शिंदे आदी.