बिटको महाविद्यालयात भारतीय शिक्षण, संशोधन आणि ज्ञानाचे आदान-प्रदान या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेस प्रारंभ..
नाशिकरोड : " नाशिकरोड महाविद्यालयाला ६० वर्ष पुर्ण होऊन परिसरात मोठा लौकिक प्राप्त केला आहे.जागतिक पातळीवर भारतीय शिक्षणपद्धती अभ्यासली गेली आहे. ज्ञानाची व्याप्ती सर्वसमावेशक आहे. ज्ञान हे अर्जंनासाठी, अर्जन अर्पित करण्यासाठी असून मिळालेले ज्ञान माझ्यासाठी नाही तर कृतार्थ भावनेने अर्पित करा. शिक्षकांची भूमिका निर्भय, प्रखर, सर्वसमावेशक असावी. शिक्षण प्रकियेची ध्येय साध्य करण्यासाठी एकत्रितपणे येउन सांघिक भावनेने, एकदिलाने व योग्य व्यवस्थापन करून अंमलाबजावणी केली तरच ज्ञानदान कार्य सफल होईल. संशोधनाला सातत्य व मेहनतीची आवश्यकता आहे. माणसाच्या मनात झरा, झेप, झुंज हवी, " असे ज्येष्ठ विचारवंत वक्ते प्रकाश पाठक यांनी केले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात ' महाराष्ट्र कौन्सिल ऑफ एज्युकेशन ऍडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट पुणे , गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक आणि डॉ. एमएसजी फाउंडेशन , मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने " भारतीय शिक्षण, संशोधन आणि ज्ञानाचे आदान-प्रदान " या विषयावर दोन दिवसीय (दि. २७ व २८ डिसेंबर ) राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत प्रकाशजी पाठक, सन्माननीय पाहुण्या संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. एस. व्ही. संत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रेसिडेंट डॉ. आर. पी. देशपांडे,एमसीईएएमचे सेक्रेटरी डॉ. के. आर. शिंपी, सल्लागार डॉ. पी. यु. रत्नपारखी, मुंबई येथील अथर्व इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. एस. पी. कल्लूरकर, विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, प्राचार्य डॉ.व्ही.एन. सूर्यवंशी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. के. सी. टकले, डॉ. अनिलकुमार पठारे, डॉ आकाश ठाकूर, डॉ. प्रणव रत्नपारखी, प्रणाली पाथरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. एमसीईएएमच्या अध्यक्षा डॉ. दीप्ती देशपांडे यांनी परिषदेला आपल्या शुभेच्छा कळविल्या. प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. एमसीईएएमचे सचिव डॉ. के. आर. शिंपी यांनी परिषदेविषयी माहिती देतांना आज होणारे हे एमसीईएएमचे ३२ वे अधिवेशन होत असल्याची माहिती दिली . याप्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते परिवर्तन, एज्युकेअर, स्मरणिका यांचे प्रकाशन केले. तसेच यावेळी ' नामदार गोपाळ कृष्ण गोखले महाराष्ट्र पुरस्कार २०२४ ' प्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड यांना डॉ. आर. पी. देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या. सन्मानपत्राचे वाचन डॉ. प्रणव रत्नपारखी यांनी केले. तसेच याप्रसंगी नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयाची हीरक महोत्सवी वाटचाल (१९६३-२०२४) वर आधारित शैक्षणिक चित्रफीत प्रदर्शनाचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .
गोखले एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट डॉ. आर. पी. देशपांडे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना, " निरपेक्ष भावनेने शिक्षकाने काम करावे. नाशिकरोड महाविद्यालय कम्म्युनिटी कॉलेज म्हणून ओळखले जाते. सातत्याने शिकत असावे. संशोधनाला महत्त्व द्यावे, आपल्यातील चांगल्या गुणांचा इतरांना सदुपयोग व्हावा त्याचा वर्तनात अंगीकार करा, सकारात्मकता आणून विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगिण विकास घडवा ." असे सांगितले.
दुपारच्या सत्रात दोन तांत्रिक सत्र संपन्न झाले. यात ' भारतीय संस्कृती आणि जगासोबत ज्ञानाचे आदान प्रदान ' व ' दर्जेदार शाळा : समग्र विकासाची गुरुकिल्ली ' या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले. यात गोखले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी संत, सनदी लेखापाल व प्रसिद्ध वक्ते प्रकाश पाठक, संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. पी. देशपांडे, मुंबई मालाड येथील अथर्व इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. एस. पी. कल्लूरकर यांनी सहभाग घेतला. या सत्रांमध्ये बोरिवली महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. महेश औटी , बिटको हायस्कूलच्या सौ. मानसी सागर, सौ रोहिणी बटवाल, सौ. प्रतिमा वाघ यांनी पेपर प्रबंध सादर केला. या सत्रात विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. के. सी. टकले, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ एज्युकेशन ऍडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट पुणे यांचे पदाधिकारी अध्यक्षा डॉ. दीप्ती देशपांडे , सचिव डॉ.के आर शिंपी, सल्लागार डॉ. पी. यु. रत्नपारखी, डॉ. व्ही झेड साळी, डॉ. एस आर. एडके, डॉ. आर. एम. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. व्ही. एन.सूर्यवंशी, गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आर. पी. देशपांडे तर एमएसजी फाउंडेशनचे श्री. के. एम. गोसावी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्नेहा रत्नपारखी यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी मानले.