शिक्षकांनी महात्मा जोतीराव फुले यांचे शिक्षणविषयक वारसा पुढे चालवावा - डॉ. ज्ञानोबा ढगे

शिक्षकांनी महात्मा जोतीराव फुले यांचे शिक्षणविषयक वारसा पुढे चालवावा -  डॉ. ज्ञानोबा ढगे
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, प्रा. भगवान कडलग, डॉ संदीप माळी, डॉ. साहेबराव मोरे, डॉ.मोहन कांबळे, आनंदा पवार व विद्यार्थी
पिंपळगाव बसवंत २८.११.२०२४
      पारतंत्र्याच्या काळात महात्मा फुले यांचे शैक्षणिक योगदान हे फार महत्त्वपूर्ण होते. समाजातील असणाऱ्या अनिष्ट रूढी, परंपरा ह्या संपुष्टात आणण्यासाठी शिक्षण हाच एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे आणि त्या दृष्टीने समाज शिक्षित कसा होईल हे त्यांनी महत्त्वाचे मानले. त्याचे हे कार्य आजही वाखण्याजोगे आहे. बहुजन समाजातील तरुणांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण देण्याचे कार्य केले. त्याच्या शैक्षणिक कार्याचा वारसा आजच्या शिक्षकांनी पुढे चालवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी व्यक्त केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. भगवान कडलग, डॉ. संदीप माळी, डॉ. साहेबराव मोरे, डॉ.मोहन कांबळे, श्री. आनंदा पवार आदी उपस्थित होते. 
डॉ. ज्ञानोबा ढगे पुढे म्हणाले की, महात्मा फुले यांनी स्त्री मुक्तीसाठी लढा उभारला, सावित्रीबाई फुले यांना त्यांनी  शिक्षण देऊन शिक्षित केले. विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध गृहांची स्थापना केली. सत्यशोधक समाज स्थापन करून सत्यशोधकीय विचार मांडले. महात्मा फुले यांचे साहित्य आजच्या तरुणांनी संशोधक वृत्तीने अभ्यासावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अजित देशमुख यांनी केले तर प्रा. सचिन कुशारे यांनी आभार मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.