प्रा. मंगल कचरू सांगळे व प्रियांका बाळासाहेब केदार यांना राज्यस्तरीय पुरस्कारने सन्मानित

सिन्नर येथील तरुप्रीत प्रकल्पांतर्गत सुमारे १५००० हून अधिक बीजारोपण व ५०० हून अधिक वृक्षारोपण करून ओसाड माळरानावर हिरवळ फुलविणाऱ्या दोन मैत्रिणी प्रा. मंगल कचरू सांगळे व प्रियांका बाळासाहेब केदार यांना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ व रंगकर्मी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकसंस्कृती साहित्य संमेलनात पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल दिला जाणारा २०२५ चा राज्यस्तरीय पुरस्कार प्रसिद्ध ग्रामीण कवी इंद्रजित भालेराव, प्रसिद्ध अभिनेत्री अदिती सारंगधर व इतर मान्यवरांच्या हस्ते लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे ८ फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात आला.
यावेळी रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिभीषण मद्देवाड, अभिनेता व निर्माते चंद्रशेखर सांडगे, प्रा. रामदास केदार, अंबादास केदार, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भास्कर बडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. मंगल सांगळे व प्रियांका केदार पर्यावरण संवर्धनासाठी तरुप्रीत प्रकल्पांतर्गत ओसाड बीजारोपण व वृक्षारोपण करत आहेत. प्रा. मंगल सांगळे व प्रियांका केदार यांनी सुरू केलेली ही हरित चळवळ आणखी जोमाने जाण्यासाठी सदर पुरस्कार प्रेरणादायी ठरणार आहे. प्रियांका बाळासाहेब केदार या औषध निर्माणशास्त्र शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तर प्राध्यापिका मंगल कचरू सांगळे या के. व्ही. एन. नाईक महाविद्यालय सिन्नर येथे मराठी विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्या पीएच. डी. करीत आहेत. त्या कवयित्री व लेखिका म्हणून देखील प्रसिद्ध असून महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सिन्नरच्या कोषाध्यक्ष पदावर त्या कार्यरत आहेत. त्यांना आजवर भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल अवॉर्ड २०२० या राष्ट्रीय पुरस्कारासोबतच अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. तरुप्रीत प्रकल्पासाठी मिळालेल्या या पुरस्कारासाठी सर्व स्तरातून प्रा. मंगल सांगळे व प्रियांका केदार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.