बी.कॉम २०२४ पॅटर्न (एन.ई.पी २०२०) -प्रा.डॉ.धीरज झालटे,अभ्यास मंडळ सदस्य,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे

बी.कॉम २०२४ पॅटर्न (एन.ई.पी २०२०) -प्रा.डॉ.धीरज झालटे,अभ्यास मंडळ सदस्य,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयात बी.कॉम २०२४ पॅटर्न (एन.ई.पी २०२०) नुसार अभ्यासक्रम व श्रेयांकपद्धती आराखडा यातील महत्त्वपूर्ण बाबीवर  टाकलेला प्रकाश

आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आगामी काळात भारताला ज्ञानाची महासत्ता बनवणे,विविध क्षेत्रासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावेत,तसेच कौशल्य निगडित व रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार व्हावेत,तसेच भावी पिढीचा त्यांच्यात असलेल्या सर्व क्षमतांचा व नैतिक मूल्यांचा जास्तीत जास्त विकास व्हावा,जागतिक पातळीवरील गुणवत्तापूर्ण शिक्षण आपल्या देशात समाजातील सर्व घटकांना उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची आखणी झालेली आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी उच्च शिक्षण संस्थांमधील विविध अभ्यासक्रमामध्ये करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मार्फत दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी एक शासन निर्णय काढून अभ्यासक्रम आराखडा व श्रेयांक पद्धतीचा आराखडा व रचना तयार करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना विद्यापीठे व महाविद्यालय यांच्यासाठी निश्चित केलेली आहे.प्रस्तुत शासन निर्णय व याच विभागाच्या १३/०३/२०२४ रोजीच्या पत्रानुसार केलेल्या सुधारीत बदला नुसार शैक्षणिक वर्ष २०२४- २५ पासून पदवीच्या प्रथम वर्षासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे बाबत निर्देश दिलेले आहे.

नुकताच बारावी वर्गाचा निकाल जाहीर झालेला आहे त्यानुसार वरिष्ठ महाविद्यालयातील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र राज्यातील कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी व ज्या इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना ए.आय.सी.टी ई,पी.सी.आय, बी.सी.आय,एन.सी.टी इ यासारख्या नियामक संस्थांची मान्यता आवश्यक नसते अशा अभ्यासक्रमासाठी लागू राहणार आहे.स्वायत्त महाविद्यालयासाठीही (Autonomous Collge) अभ्यासक्रमासाठी श्रेयांक रचना कशी असेल याबाबत या शासन निर्णयात माहिती देण्यात आलेली आहे.या नवीन शैक्षणिक धोरणाच्या आराखड्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.सुरेश गोसावी,प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर,वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ.यशोधन मिठारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य शाखेतील विविध अभ्यासमंडळाचे अध्यक्ष व सदस्य असलेल्या समन्वय समितीने बी.कॉम पदवीसाठीच्या एन.ई.पी.२०२० नुसार नवीन अभ्यासक्रमाची रचना बीकॉम(२०२४ पॅटर्न) या नावाने तयार केली आहे.ह्या अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थी,प्राध्यापक,पालक तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांना व्हावी यासाठी या लेखाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे

.महाराष्ट्र शासनाने २६ एप्रिल २०२२ च्या शासन निर्णयाद्वारे मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणी बाबत धोरण ठरवण्यासाठी एक उपसमिती गठीत केली होती.या समितीने आपलाअहवाल शासनास सादर केला होता,त्यानुसार उपसमीतीच्या अहवालातील शिफारशीची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आढावा घेऊन येणाऱ्या अडचणी निवारण्यासाठी उपाययोजना सूचनासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी शासनाने दिनांक २६ डिसेंबर २०२२ रोजी एक शासन निर्णय काढून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डॉ.नितीन करमाळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक सुकाणू समितीची स्थापना केली.या सुकाणू समितीने केलेल्या शिफारशीनुसार महाराष्ट्र शासनाच्या २० एप्रिल २०२३च्या शासन निर्णयानुसार मल्टिपाय एन्ट्री व मल्टीपाय एक्झीट ऑप्शन सह तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम किंवा चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम निवडण्याची विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध झालेली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बीकॉम २०२४ पॅटर्न अभ्यासक्रम रचनेत पदवी अभ्यासक्रमासाठी पुढील प्रमाणे रचना करण्यात आलेली आहे.

यात विद्यार्थ्याने फक्त एक वर्षासाठी २२ क्रेडिट मिळून अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्या विद्यार्थ्यास पदवीमधील प्रमाणपत्र मिळणार आहे,जर फक्त दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास पदविका प्रमाणपत्र दिले जाणार आहे.तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून दिलेले क्रेडिट प्राप्त केल्यास बीकॉमची बॅचलर डिग्री विद्यार्थ्यास मिळणार आहे,तर चार वर्षासाठीच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास बॅचलर डिग्री ऑनर्स किंवा बॅचलर डिग्री ऑनर विथ रिसर्च या नावाची पदवी पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.या नवीन रचनेनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी बी.कॉम पदवीसाठी पुढील स्पेशलायजेशन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

१) बीकॉम इन अकाउंटन्सी अँड टॅक्सेशन २) बीकॉम इन कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट ३) बीकॉम इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन ४) बीकॉम इन मार्केटिंग ५) बीकॉम इन बिझनेस प्रॅक्टिसेस अँड कॉपरेशन ६)बीकॉम इन बँकिंग फायनान्स अँड इन्शुरन्स ७)बीकॉम इन बिजनेस लॉ ८)बीकॉम इन बिझनेस मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स अँड ऍनॅलिसिस.

वरील सर्व अभ्यासक्रमासाठी सेमीस्टर पद्धती असणार आहे.दर वर्षाला दोन सेमीस्टर असणार असून प्रती सेमीस्टरसाठी २२ क्रेडिट असणार आहे.थोडक्यात प्रत्येक वर्षाला ४४ क्रेडिट असणार आहे.तीन वर्षाच्या पदवीसाठी एकूण १३२ क्रेडिट असणार आहे.चार वर्षाच्या पदवीसाठी १७६ क्रेडिट निश्चित करण्यात आलेले आहे.वरील सर्व क्रेडीटची विभागणी त्या त्या विषय व कोर्ससाठी असणार आहे.एका क्रेडिट साठी २५ गुण असतील.तीन वर्षाच्या पदवीसाठी मेजर मँडेटरी विषयासाठी एकूण ४४ क्रेडिट असणार आहे,मेजर इलेक्टिव्ह विषयासाठी आठ क्रेडिट असून,मेजर मायनर विषयासाठी १८ क्रेडिट,व्होकेशनाल स्किल कोर्ससाठी आठ क्रेडिट,फील्ड प्रोजेक्ट/ऑन द जॉब ट्रेनिंग साठी १० क्रेडिट,जनरिक इलेक्ट्रिव किंवा ओपन इलेक्टिव्ह कोर्ससाठी आठ क्रेडिट,एबिलिटी एनॅसमेंट कोर्ससाठी ०८ क्रेडिट, इंडियन नॉलेज सिस्टीम कोर्ससाठी ०४ क्रेडिट,व्हॅल्यू एनसमेंट कोर्ससाठी ०४ क्रेडिट,स्किल एनसमेंट कोर्स साठी ०६ क्रेडिट व को करिकुलर एनांस्ममेंट कोर्ससाठी ०६ क्रेडिट निश्चित करण्यात आलेले आहे.चार वर्षाच्या पदवीसाठी विद्यार्थ्यास एकूण १७६ क्रेडिट असणार आहे.विद्यार्थ्याच्या मार्कशीट वर मार्कांचा कुठंही उल्लेख न करता त्या त्या विषयासाठी प्राप्त केलेले क्रेडिट व ग्रेडचा उल्लेख असणार आहे.

या अभ्यासक्रमाचे वैशिष्टे म्हणजे मेजर मँडेटरी,मेजर इलेक्टिव्ह,मेजर मायनर सब्जेक्ट बरोबरच स्किल ओरिएंटेड कोर्स/क्षमताधिष्ठ कोर्स/व्यावसायिक कौशल्य असणारे कोर्स/फिल्ड प्रोजेक्ट/आय.के.एस/व्हॅल्यू एज्यूकेशन कोर्सेस/अभ्यासपूरक कोर्स/संशोधन प्रकल्प आदी पूर्ण करणे विद्यार्थ्यांना सक्तीचे असणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराचे कौशल्य तर निर्माण होईलच त्याच बरोबर त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य गुण विकसित होण्यासाठी चांगली मदत होणार आहे.थेरॉटिकल ज्ञानाबरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजचा समावेशही या अभ्यासक्रमात केलेला आहे.मेजर मॅनडेटरी सब्जेक्ट मध्ये आपल्या महाविद्यालयातील स्पेशलचे विषय येतील.तर मायनर मध्ये आपल्या कॉलेजमधील काही जनरल विषय येतील.ओपन इलेक्टिव कोर्स साठी दुसऱ्या विद्या शाखेतील एक/दोन विषय विद्यार्थ्यास घेता येणार असल्याने विद्यार्थ्यांना एकाच वेळी बहुशाखीय शिक्षण शिकण्याची सोय निर्माण होणार आहे.सर्व अभ्यासक्रमासाठी मल्टिप्राय इंट्री तसेच मल्टिप्राय एक्झिट चा पर्याय असणार आहे.त्या त्या विषयाचे टीचींग करण्यासाठी प्रती क्रेडिट १५ तास असणार आहे.पूर्वी ५० मिनिटांचे एक लेक्चर असायचे ते नवीन धोरणानुसार १ तासाचे असणार आहे.सद्य स्थितीत महाविद्यालयात ज्या विषयांना शासनाची मान्यता व विद्यापीठाची मान्यता असेल त्या विषयातून विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मेजर व मायनर विषय निश्चित करावे लागणार आहे.पदवीच्या अभ्यासक्रमात ठराविक क्रेडिट हे सक्तीने ऑन जॉब ट्रेनिंग/फील्ड प्रोजेक्ट/इंटर्नशिप साठी राखीव असणार आहे त्यामुळे प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणे विद्यार्थ्यांना शक्य होणार आहे.

शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली मायनर विषय व मेजर विषय कोणते याबाबत मार्गदर्शक सूचना विद्यापीठे तयार करणार आहे तसेच वर नमूद केलेले कोर्सेस यादी मेजर सब्जेक्टशी संबधित असल्याने यानुसार विषयांचे अध्यापन करावे लागणार आहे.बीकॉम पदवीसाठी नव्या रचनेनुसार काही विषयांना चार क्रेडिट,काहींना २ क्रेडिट  व काही कोर्ससाठी २ क्रेडिट असल्याने  टाइमटेबल बनवताना एका आठवड्यात काही विषयांचे लेक्चर चार असतील तर २ क्रेडिटच्या कोर्सचे आठवड्यात दोन लेक्चर असतील.एका क्रेडिट साठी १५ तास असणार आहे.त्यामुळे वर्कलोड निश्चित करताना काळजी घ्यावी लागणार आहे,सध्या अस्तित्वात असलेला त्या त्या विभागाचा कार्यभार (work load) कमी होणार नाही याचा विचार सुकाणू समितीने या अगोदरच केल्याची माहिती एन.ई.पी बाबत वेगवेगळ्या ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यशाळेत मान्यवरांनी दिल्याने तूर्त याविषयी सकारात्मक विचार करावा.पदवीच्या दुसऱ्या वर्षापासून प्रत्येक सेम साठी साठी थेरी बरोबरच आपल्या मेजर सब्जेक्ट रीलेटेड विषयाचे दोन क्रेडिट साठी प्रॅक्टिकल असणार आहे.तृतीय वर्षासाठी मेजर सब्जेक्ट विषयाशी संबंधित कोर्स साठी प्रत्यक्ष लॅब मध्ये (प्रयोगशाळा) मध्ये प्रॅक्टिकल पूर्ण करण्याची रचना निश्चित करण्यात आलेली आहे,त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल नॉलेज मध्ये भर पडणार आहे.वाणिज्य शाखेसाठी प्रॅक्टिकल साठीचा वर्कलोड धरला जाईल की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.मात्र यावर सकारात्मक तोडगा निघेल असा आशावाद आहे.यादृष्टीने आगामी काळात सर्व महाविद्यालयांना वाणिज्य शाखेसाठी कॉमर्स लॅब अद्यावत कराव्या लागणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तसेच या विद्यापीठाच्या सलग्न महाविद्यालये व संस्थांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी केली जाणार आहे.त्यामुळे बीकॉम चे प्रथम वर्षाचे प्रवेश घेताना पुढीलप्रमाणे विषय व कोर्स असतील.१)डिसिप्लिन स्पेसिपीक कोर्स मधील सब्जेक्ट-१ साठी आपल्या महाविद्यालयाने निश्चित करून दिलेल्या पर्यायी विषयातून एक विषय निवडावा लागेल २) डिसिप्लिन स्पेशीपीक कोर्स अंतर्गत सब्जेक्ट -२ साठी महाविद्यालयाने दिलेल्या पर्यायी विषयातून एक विषय निवडावा लागेल.( डी.एस.सी.२ निवडतांना  डी.एस.सी-१ मध्ये निवडलेला विषय सोडून इतर विषय घ्यावा) ३) डिसिप्लिन स्पेशीपीक कोर्स सब्जेक्ट ३ साठी विद्यापीठाने दिलेल्या रचनेतील एक विषय सक्तीने विद्यार्थ्यांना घ्यावा लागणार आहे.डी.एस.सी.साठीचे वरील तीन विषय प्रत्येकी चार क्रेडिटचे असतील. पहिल्या सेम प्रमाणे डी.एस.सी सब्जेक्टची रचना दुसऱ्या सेम साठी राहील.पहिल्या व दुसऱ्या सेम साठी २ क्रेडिट साठी एक ओपन इलेक्टिव कोर्स विद्यार्थ्यास निवडावा लागणार आहे.पहिल्या सेम साठी एक इंडियन नॉलेज सिस्टीम कोर्स २ क्रेडिटचा असेल,तसेच एक एबीलिटी एननेसमेंट कोर्स,एक स्किल एनांसमेंट कोर्स,एक व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स २ क्रेडिटचा असनार आहे.पहिल्या सेमसाठी एकूण २२ क्रेडिट असतील.प्रथम वर्षाच्या दुसऱ्या सेमसाठी पहिल्या सेम सारखीच विषय व क्रेडिट रचना असेल.मात्र दुसऱ्या सेमसाठी आय.के.एस ऐवजी २ क्रेडिट चा को करीकुलर एनांस्मेंट कोर्स असेल.विषय व कोर्स धरून दोन्ही सेम साठी १६ पेपर असणार आहे.शासन निर्णयामध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार व विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात दिलेल्या रचनेनुसार महाविद्यालयांना अंमलबजावणी करावी लागणार असून,प्रत्येक विद्यार्थ्यास वरील मार्गदर्शक तत्त्वानुसार अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.विद्यार्थ्याचे मूल्यमापन अंतर्गत मूल्यमापन व सेमीस्टर एंड एकझाम या प्रकारे ३०:७० या प्रमाणात केले जाणार आहे.अंतर्गत मूल्यमापनाच्या ३० गुणासाठी शिक्षकांना पुढील पैकी कोणत्याही दोन पर्यायाचा वापर करता येणार आहे.ऑफलाईन लेखी परीक्षा,असाएनमेंट/टिटोरियल, पी.पी.टी,तोंडी परीक्षा,ओपन बुक टेस्ट,गटचर्चा,केस स्टडी विश्लेषण इ. अंतर्गत मूल्यमापन व सेमीस्टर एंड परीक्षेत पासिंगसाठी किमान ४० टक्के गुण विद्यार्थ्यास मिळणे आवश्यक आहे.ए.टी.के.टी बाबत तसेच रिचेकिंग रिव्हल्युशन बाबत यापूर्वी असलेले नॉर्म चालू राहणार आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी महाविद्यालय विद्यापीठात करताना सुरुवातीच्या काळात ही आराखडा रचना/ पद्धती नवी असल्याने काही प्रमाणात समजून घेतांना कदाचित काही अडचणी येऊ शकतील मात्र जसजशी हे अभ्यासक्रम सुरू होतील तसतशी अधिकची माहिती सर्व संबधित घटकास क्रमशः होईल असा आशावाद आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना मनःपूर्वक शुभेच्छा..

प्रा.डॉ.धीरज झालटे,अभ्यास मंडळ सदस्य,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे

९७६६१६६०६४