सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात साजरी

सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात साजरी

सम्राट अशोकाच्या धम्म प्रचार व प्रसारातील योगदानावर प्रकाश टाकणारे अभ्यासपूर्ण व्याख्यान नुकतेच नाशिक येथे पार पडले. या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा. आनंद देवडेकर सर यांनी आपल्या सखोल अभ्यास आणि मधुर वाणीने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

प्रा. देवडेकर सरांनी सम्राट अशोकाच्या कार्याची चिकित्सा करताना त्याने धम्माच्या प्रसारासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत सविस्तर माहिती दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त बौद्ध धम्मच दिला नाही, तर त्यासोबत असलेला हजारो वर्षांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा — लेणी, लिपी, शिल्प व अन्य माध्यमांतून — समाजाला दिल्याचे त्यांनी नमूद केले.

तिसऱ्या धम्म संगीतीचे आयोजन करून सम्राट अशोकाने धम्मातील अशुद्ध विचारांचे शुद्धीकरण केले, यावरही त्यांनी भर दिला. धम्मचक्र आणि राजमुद्रा यांसारख्या राष्ट्रीय चिन्हांमधून आजही अशोकाच्या लोककल्याणकारी राजवटीची आठवण जपली जाते, असे त्यांनी सांगितले. तसेच जगभरातील विविध अभ्यासकांनी सम्राट अशोकाबाबत केलेल्या गौरवोद्गारांचेही त्यांनी आपल्या भाषणात प्रभावीपणे उल्लेख केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. संतोष जोपुळकर सर होते. त्यांनी सम्राट अशोकाच्या शिलालेखांतून प्रकट होणाऱ्या विविध राजाज्ञांची माहिती देत त्याच्या लोककल्याणकारी दृष्टिकोनाचे विश्लेषण केले.

या विचारप्रवर्तक कार्यक्रमाला नाशिक शहरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.