क. का. वाघ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत येथे आयोजित स्व.यशवंतराव चव्हाण व कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे यांच्या जयंतनिमित्त अभिवादन
पिंपळगाव बसवंत १२.०३.२०२४
समाजाला प्रगतीपथावर आणायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण हे तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे हेच ध्येय घेऊन कर्मवीरांनी आपले योगदान दिले आहे. यामध्ये ॲड. बाबुराव ठाकरे यांचे समाज व संस्थाहित जोपासण्याचे कार्य वाखाण्याजोगे आहे. सर्वसामान्यांना योग्य मार्गदर्शन करणे, शेतकऱ्यांचे हितचिंतक म्हणून काम करत असत. उच्च कोटीची नैतिकता ही त्यांच्या कामातून दिसत असे. आपल्या माणसे, सहकारी कर्मचारी त्यांच्या कुटुंबाविषयी त्यांच्या मनात प्रचंड प्रेम, आपुलकी, सहानुभूती होती. एक शिस्तप्रिय, वक्तशीर, नि:स्पृह, कर्तव्यनिष्ठ, निष्णात कायदेपंडित, उत्तम प्रशासक व मीतभाषिक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाळासाहेब गुंजाळ यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव बसवंत येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य दिलीप माळोदे, डॉ. निलेश आहेर आदी उपस्थित होते.
डॉ. बाळासाहेब गुंजाळ पुढे म्हणाले की, ॲड. बाबुराव ठाकरे यांनी संस्थेत २० वर्ष सरचिटणीस जबाबदारी यशस्वीपणे पेलावली. त्यांनी संस्थेचे अध्यक्षपद देखील भूषविले.मविप्र संस्थेच्या १३१ शाखा त्यांच्या काळात सुरु झाल्या. याकाळात शाखाविस्तार करताना अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागले. परंतु विद्यार्थी, समाजाप्रति असलेल्या तळमळीतून त्यांनी मात करत आपला ध्यास सुरूच ठेवला. शिस्त, गुणवत्ता,पारदर्शकता यांना त्यांनी प्राधान्य दिले. विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबरच संस्थेत काम करणाऱ्या सेवकांच्या विकासाकडे बारकाईने लक्ष दिले. सेवकांनी उच्च शिक्षित व्हावे, तसेच त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी ते सेवकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘मविप्र समाज सेवक सहकारी पतपेढी’ची स्थापना केली. लग्न कार्यात अवाजवी खर्च करू नका त्याऐवजी शिक्षणावर अधिकाधिक खर्च करावा हा त्यांचा आग्रह असे. न्याय क्षेत्राचे ते मानदंड ठरले. स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. त्यांचे स्वप्न प्रत्येक तालुका ठिकाणी शैक्षणिक संकुल असावं. मविप्र परिवार असून त्याच्या विकासासाठी आहोरात्र कार्यरत राहून संस्थेला एका उंचीवर नेऊन ठेवण्यासाठीचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांचे राहिले असे विचार त्यांनी मांडले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मविप्र उपाध्यक्ष विश्वासराव मोरे म्हणाले की, ज्या संस्थेत आपण शिक्षण घेत आहोत त्या संस्थेच्या कर्मवीरांचा इतिहास विद्यार्थ्यांना माहिती होणे आवश्यक आहे. समाजधुरीनांच्या कार्यामुळेच आज खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तसेच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे कार्य हे नाशिक जिल्ह्याला अग्रस्थानी आणण्यासाठी महत्त्वपूर्ण होते. पिंपळगाव महाविद्यालयाचे भूमिपूजन हे त्यांच्या हस्ते करण्यात आले होते, असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलेश आहेर यांनी केले तर आभार प्रा. नामदेव गावित यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.