सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम मंगळवार दिनांक २१ जानेवारी रोजी करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.व्ही. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले होते.

रा.से.यो. अधिकारी प्रा. मंगल सांगळे यांनी गेल्या सात दिवसांत पास्ते गावात केलेल्या कामाचा आढावा तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दलची भावना आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केली. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यापुढेही नानाविध सामाजिक उपक्रमांसाठी कार्यरत राहणार असल्याचे देखील त्यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले. समन्वयक प्रा. बाळासाहेब चकोर यांनी विद्यार्थ्यांना श्रम व त्याचे मूल्य समजावले. तसेच स्वयंसेवकांच्या कामाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पखाले यांनी विद्यार्थ्यांनी आणखी जीवनमूल्ये विकसित करण्याबाबत मार्गदर्शन केले. सात दिवसांतील शिबिरातील अनुभवांचे कथन करीत शिबिरात सहभागी होता आले याबद्दल रा.से.यो. स्वयंसेवकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी पास्ते गावातील माजी सरपंच शरद आव्हाड, डी.पी.आव्हाड विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश सानप, तंटामुक्ती अध्यक्ष गोपाळनाना आव्हाड, रामा आव्हाड आदी मान्यवर तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. माधुरी उन्हाळे, प्रा. सागर सानप, महाविद्यालयातील परीक्षा विभाग प्रमुख स.प्रा. संतोष आव्हाड, विद्यार्थी विकास अधिकारी स.प्रा.डॉ. ज्योती गायकवाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख स.प्रा. पूनम कुटे, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता बागूल हिने केले तर तृप्ती डुबल हिने आभार मानले.