दिव्यांग व्यक्तींचा सन्मान व्हावा - प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांचे प्रतिपादन

दिव्यांग व्यक्तींचा सन्मान व्हावा - प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांचे प्रतिपादन
जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सन्मानित करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदे, प्रा. डॉ. छाया भोज, प्रा. संपत कदम, प्रा. शशिकांत घुटे, प्रा.अजित देशमुख आदी.
पिंपळगाव बसवंत ३.१२.२०२४ मंगळवार
          सर्वसामान्य व्यक्तींसारखे दिव्यांग व्यक्तींनाही सुखकर जीवन जगावे वाटते. दिव्यांग असल्याकारणाने त्यांना अनेक ठिकाणी समस्यांना तोंड द्यावे लागते. या कारणामुळे त्यांना ते समाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र दिव्यांग व्यक्तींचा सन्मान व्हायला हवा व त्यांना सक्षम करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले पाहिजे. दिव्यांग व्यक्तीत देखील कौशल्ये व क्षमता असते. त्यामुळे त्यांनी स्वतःतील क्षमता व आत्मविश्वासाचा साह्याने यश मिळविण्याचा प्रयत्न करावा. दिव्यांग व्यक्तींना शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासाच्या समान संधी मिळाव्यात यासाठी शासनाने व समाजाने प्रयत्न करावेत.त्यांच्या मनी एकटेपणाची भावना निर्माण होऊ नये यासाठी समाजाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आयोजित  जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदे, प्रा. डॉ. छाया भोज, प्रा. संपत कदम, प्रा. शशिकांत घुटे, प्रा.अजित देशमुख आदी उपस्थित होते.
डॉ. ज्ञानोबा ढगे पुढे म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या हक्कांची, वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती व्हावी हा जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. दिव्यांगांसाठी प्रत्येक क्षेत्रात जागा आरक्षित केल्या जात आहे. शासन वेगवेगळ्या योजना राबवीत आहे. तसेच त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुलभूत सोईसुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याप्रसंगी महाविद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दैनंदिनी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक  प्रा. डॉ. छाया भोज यांनी केले तर आभार प्रा.अजित देशमुख यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.