कष्टकऱ्यांचे झुंजार सेनानी भाई उद्धवराव पाटील

भाई उद्धवराव पाटलांना जाऊन जवळ-जवळ ४० वर्षे पूर्ण झालेली आहेत. या ४० वर्षामध्ये भारताच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक, कृषिविषयक, माहिती-तंत्रज्ञान विषयक परिस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल घडून आलेले आहेत. आजच्या या नव्या सुजलाम-सुफलाम ग्रामीण महाराष्ट्राच्या व भारताच्या निर्मितीसाठी भाई उद्धवराव पाटलांचे योगदान जनसामान्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांचा मनामधून कदापी ही पुसने शक्य नाही. हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील, गोवा मुक्ती संग्रामातील, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचे कार्य तसेच राज्यस्तरीय भूविकास बँकेचे संचालक म्हणून त्यांनी केलेले कार्य व तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी केलेले कार्य, हे खूप मोठे राहिले आहे. आशा या जनसामान्याचा, कष्टकऱ्यांचा व शेतकऱ्यांचा आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्मात्या युगपुरुषाची व त्यांच्या कार्याची ओळख आजच्या वर्तमान पिढीला होणे गरजेचे आहे. करण भारतामध्ये सद्यस्थितीत राष्ट्र व राष्ट्र धर्माचे हित बाजूला सारून, विचारधाणां पूर्णपणे तिलांजली देवून, वर्तमानातील राजकारणी मांडळी ज्या पद्धतीने, केवळ सत्तेसाठी व स्वतच्या स्वार्थासाठी एका रात्रीतून पक्ष व विचारधारा बदलताना दिसून येतात, त्याच महाराष्ट्रात थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर नेहून बसवणारी गाडी स्व:च्या दारात येवून उभी असताना ही, आपला पक्ष आणि आपली विचारधारा यास प्राधान्य देवून, विचारधारेशी प्रामाणिक राहणाऱ्या राजकारणातील खऱ्या अर्थाने ज्यांना संत म्हणता येईल असे व्यक्तीमत्त्व असलेले भाई उद्धवराव पाटील कोण होते हे आजच्या वर्तमान पिढीने जाणून घेणे खूप गरजेचे आहे.
भाई उद्धवराव पाटलांचा अल्पपरिचय :- भाई उद्धवराव पाटलांचा जन्म मराठवाड्यातील भौगोलिक दृष्ट्या अत्यंत मागासलेल्या आजच्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील आत्यंत दुष्काळी इर्ले या गावी सामान्य शेतकरी कुटुंबात साहेबराव व विठाबाई या दामंपत्यांच्या पोटी ३० जानेवारी १९२० रोजी झाला. तर त्यांचा मृत्यू १२ जुलै १९८४ रोजी कॅन्सरच्या आजाराने झाला. महाराष्ट्रातील डाव्या चळवळीचा समर्थ वारसा असलेल्या तुळजापुरच्या हरिचंद्र भोसले कुटुंबातील डाव्या चळवळीच्या संस्कारातच भाई उद्धवराव पाटलांचे बालपण खुलले होते. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीमत्तेच्या भाईंनी हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठातून एल. एल. बी. ची पदवी संपादन केली होती. त्यांनी सुरवातीच्या काळात शेतकरी, कष्टकरी व मजूर यांची सावकाराच्या जाचातून मुक्तता करण्यासाठी स्वतःची वकिली कामी लावली होती. परंतु तत्वनिष्ठ स्वभावामुळे त्यांना खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करणे जमले नाही. शेवटी त्यांनी वकिली कायमची सोडली.
भाई उद्धवराव पाटलांचा राजकीय व सामाजिक प्रवास :- साधारणपणे १९५० ते १९८४ पर्यंत भाई उद्धवराव पाटील यांच्या नावाचा महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठा दबदबा होता. शेतकरी कामगार पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या भाई उद्धवराव पाटलांनी पक्षाच्या उभारणीत व पक्षाच्या वाढीत आत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत भाईंनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी जनतेला एकत्र करून भाई उद्धवराव पाटलांनी उभारलेले लढे व संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीतील त्यांचे योगदान खूप मोठे राहिलेले आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर या घटनेवर विचार करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत भाईंनी हा “हा विजय अपुरा आहे सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ठ झाल्यानंतरच तो पूर्ण होईल आणि जो पर्यंत लोखंड तापलेले आहे तोवर घाव घातले पाहिजे” असे ठामपणे सांगून त्यांनी बेळगाव, कारवार निपाणी आणि भालकी-बिदरचा कर्नाटकात गेलेला सिमाप्रदेश महाराष्ट्रात सामील करण्याची गरज पटवून दिली होती. भाई उद्धवराव पाटलांनी त्या वेळी बोलून दाखवलेल्या विचारांची दखल सर्वच स्तरातून घेऊन सीमाभागाचा लढा अजून लढला गेला असता तर वर्तमानात वेळोवेळी डोकेदुखी ठरणारा सीमा प्रश्न हा कायमचा मिटलेला असता.
भाई उद्धवराव पाटलांचा विधिमंडळातील प्रवास हा उल्लेखनीय राहिला आहे. सर्वप्रथम धाराशिव (उस्मानाबाद) मतदार संघातून १९५२-१९५७ या काळात देशातील पहिली सार्वजनिक निवडणूक लढवून ते हैद्राबाद राज्यातील पहिल्या विधानसभेत निवडून गेले होते. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षाच्या आघाडीचे उपाध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते. १९५७ ते १९६२ या काळात ते राज्य विधानसभेचे सदस्य होते. १९५८ साली संयुक्त महाराष्ट्र समितीचे विधानसभेमध्ये ते नेते होते. १९६९ व १९७० मध्ये त्यांनी लोकलेखा समितीचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. १९६४ ते १९६७ या कालवधीत भाई उद्धवराव पाटलांनी राज्यसभा गाजवली तर १९७७ साली ते लोकसभेवर निवडून गेले. मराठवाडी बोली भाषेचा पगडा असलेले भाई उद्धवराव पाटील हे खर्डे वक्ते विचारांची स्पष्टता आणि उत्तम प्रकारे मांडणी करत असल्यामुळे त्यांची विधिमंडळातील कारकीर्द नेहमीच चर्चेचा विषय ठरत असे. सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता, शेती विषयक, आर्थिक अशा सर्वच विषयांवर भाईंची अत्यंत स्पष्ट भूमिका असायची, त्यांनी विधिमंडळात केलेली भाषणे आजही उपयोगी पडतील अशीच आहेत. भाईंचे भाषण ऐकण्यासाठी आनेक तात्कालीन थोर नेते स्वतः जातीने उपस्थित राहत असत. भाई उद्धवराव पाटलांची हैद्राबाद विधिमंडळातील कारकीर्द ही खूप प्रेरक व अनेकांसाठी मार्गदर्शक ठरवी अशीच होती. त्यांच्या कार्याबद्दल गौरव पर उदगार काढतांना जुन्या हैद्राबाद राज्यातील श्री. एम. चेनारेडी, माजी कृषी मंत्री श्री. व्ही. सुब्रम्हण्यम नेहमी म्हणायचे “भाई उद्धवराव पाटलांइतका अभ्यासू लोकप्रतिनिधी आम्ही पाहिला नाही. ” तसेच तेथिल आनेक सत्ताधारी मंत्री आपल्या पक्षाच्या आमदारांना उत्तम विधिमंडळ पट्टू व्हायचे असले तर भाई उद्धवराव पाटलांची विधिमंडळातील भाषणे काळजीपूर्वक ऐकण्याचा व ते वाचण्याचा सल्ला देत असत. भाई उद्धवराव पाटलांची विधिमंडळातील भाषणे ऐकण्यासाठी यशवंतराव चव्हाण हे स्वतः उपस्थित असायचेच त्यांच्या वक्तव्याची दखल मुखमंत्री असो वा अन्य बडे नेते किंवा अधिकारी यांनी घेतली नाही असे कधीही झाले नाही. त्याकाळात सत्ताधारी पक्षाला भाई उद्धवराव पाटलांच्या भाषणांची नेहमीच धडकी भरलेली असायची.
देशातील कोणत्याही निवडणुकीत जातींचे संख्याबळ पाहून उमेदवारी दिले जात आहे व त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही त्या-त्या जातीचाच पुढारी आवर्जून पाठविला जातो. आशा पद्धतीची निवडणुकीच्या माध्यमातून होत असलेली जातीय विषाची पेरणी थांबविणे अत्यंत गरजेचे आहे, हे जर थांबविले नाही तर देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेस मोठ्याप्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो, असे भाई उद्धवराव पाटील परखड शब्दात नेहमी मांडत असत. याचेच आनेक प्रत्यय वर्तमानात होणाऱ्या निवडणुकांकडे एक नजर टाकल्यास सर्वत्र तेच चित्र दिसून येते.
विचारधारेला तिलांजली देऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यास नम्रपणे नकार:- १९६२ ला यशवंतराव चव्हाणांना देशाचे संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला जावे लागले होते. तेंव्हा यशवंतरावांनी महाराष्ट्रातील सर्वात अभ्यासू नेता म्हणून त्यांची महाराष्ट्रातील पुढील धुरा सांभाळण्यासाठी भाई उद्धवराव पाटलांना कॉंग्रेस पक्षात घेऊन मुख्यमंत्री करण्यासाठी हालचाली केल्या, त्यात तत्कालीन राज्यसभेचे खासदार असलेले रामराव आवरगावकर यांना यशवंतरावांनी निरोप देऊन, धाराशिवला (उस्मानाबाद) त्यांच्या घरी पाठवले होते, तसा निरोप घेऊन रामराव आवरगावकर धरशिवला (उस्मानाबादला) गेले भाई उद्धवराव पाटलांनी त्यांना घरी चहा पाजला व यशवंतरावांचे आभार मानले आणि त्यांना असं निरोप धाडला की, “तुम्ही देऊ केलेला सन्मान मी स्वीकारू शकत नाही, कारण मी डाव्या चळवळीचे राजकारण करतो शेतकरी कामगारांच्या लाल झेंड्यातच माझे पार्थिव गुंडाळले जाणार आहे, मला सत्तेचा कसलाही मोह नाही.” भाई उद्धवराव पाटलांचा हा निरोप घेवून, रामराव आवरगावकर रिकाम्या हाताने परत गेले. कोणत्याही गैर-वाम मार्गाशिवाय सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होण्याची संधी भाई उद्धवराव पाटलांच्या दारात येवून उभी असताना पक्ष आणि विचारधारा यासाठी पूर्णपणे स्वत:ला वाहून घेतलेल्या भाई उद्धवराव पाटलांनी अगदी सहज व नम्रपणे आपल्या विचारधारेसाठी सत्तेच्या खुर्चीत विराजमान होण्यास नकार दिला. पुढे जेव्हा कॅन्सरच्या असाध्य रोगाने भाई उद्धवराव पाटील गेले तेव्हा खरोखरच त्यांचे पार्थिव लाल झेंड्यातच गुंडाळलेले होते.
सत्तेचा कसल्याही प्रकारचा मोह नसलेल्या भाई उद्धवराव पाटलांनी समाजसेवेसाठी स्वतःचे आयुष्य झिझवले, आनेक वर्षे आमदार असून सुद्धा त्यांचाकडे धाराशिवमध्ये (उस्मानाबाद) स्वतःचे घर नव्हते. सत्ता, संपत्ती, जमीन-जुमला, घर-दार यांचे स्वप्न भाई उद्धवराव पाटलांना कधीही पडले नाही, त्यांना कष्टकरी-बळीराजा सुखी होऊन, त्याचे राज्य कसे येईल यासाठी ते सतत प्रयत्नवत असत. शेवटी स्वतःचे घर असावे म्हणून भाई उद्धवरावांच्या पत्नी शारदाबाईंनी काटकसर करून धाराशिवमध्ये उस्मानाबादमध्ये घरासाठी जागा खरेदी केली, पण ते बांधण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता. कार्यकर्त्यांनी घर बांधण्याचा हट्ट धरला तेव्हा त्यांनी अल्प उत्पन्न गटाच्या योजनेतून कर्ज काढून घर बांधले आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्यांना आयुष्याच्या शेवटपर्यंत कर्जाचे हप्ते भरावे लागले. असे हे राजकारणात राहून प्रामाणिकपणे समाजाची रात्रदिवस सेवा करणारे ज्यांना राजकारणातील संत म्हणता येईल असे भाई उद्धवराव पाटील आणि वर्तमानात राजकारणात स्वतःची सत्तेची पोळी भाजावी म्हणून रात्रीतून पक्ष बदलून, इतर पक्षात वाहत जाणारे नेते आणि आयुष्यभर जन-कल्याणासाठी घरा-दराचा कसलाही विचार न करता स्वतःला जनसेवेत वाहून दिलेले भाई उद्धवराव पाटील यांची कसल्याही प्रकारे तुलना करण्याची कल्पनाही न केलेले बरे.
राष्ट्रीय एकात्मतेस तडा देवून टी भंग करणारे राजकारण भारतात नेहमीच होत आले आहे. यात गाईचे राजकारण ही खूप मोठया प्रमाणावर केले जात आहे, यातून कांही ठिकाणी दंगली घडवून आणने किंवा एका समुहाकडून विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांना संशयीत व सूड भावनेच्या नजरेतून पाहून, त्यांची हत्या केली जात आहे. हे विष पसरवणारे राजकारण थांबवण्यासाठी भाई उद्धवराव पाटलांनी विधिमंडळात केलेली राष्ट्रीय एकात्मतेवरील भाषणे पाहिली तर त्यांनी, आशा लोकांचा व आशा प्रकारच्या राजकारणाचा खरपून समाचार घेतला असल्याचे दिसून येते. त्यात ते एके ठिकाणी आपल्या मराठमोळ्या साध्या वानीतून म्हणतात की, “ज्यांना गाय पाळायची नाही, त्यांनी गाईच्या संरक्षणाच्या चळवळीचे नेतृत्व आपल्या हाती घेतले आहे, ज्यांना खेड्यातील जीवनाची, समस्यांची कसलीही जाणीव नाही त्यांनी मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागामध्ये गेले तर वाऱ्याने उडून जातील अशी जनावरे ठिक-ठिकाणी दृष्टीस पडतील. गाईचा प्रश्न शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी निगडीत आहे. जिला आई म्हणतो तिला खावयाला घालायचे नाही, तिला अन्न द्यावयाचे नाही, उलट गाईबद्दल प्रेम दाखवायचे आणि समाजामध्ये विषमता पसरवायचे हे थांबवणे खूप गरजेचे असून, गाईवर असलेले ढोंगी आणि बेडगी प्रेम करणारे निकालात काढण्याची वेळ आली आहे. त्यांचे लाड करणे भारताच्या भविष्यासाठी धोकादायक ठरेल.” असे परखड मत भाई उद्धवराव पाटलांनी मांडले होते. वर्तमानातील गाईचे राजकारण पाहता त्यांनी मांडलेले हे भविष्याचा वेध घेणारे विधान किती महत्त्वाचे ठरत आहे हे लक्षात येते. थोडक्यात भाई उद्धवराव पाटील यांच्या जीवन-कार्य व विचारांचा शोध व वेध घेतला असता असे लक्षात येते की, महाराष्ट्राच्या राजकारणात साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही भूमिका भाई उद्धवराव पाटीलांनी स्वतःला तथाकथित गांधीवादी म्हणवणाऱ्या पेक्षा जास्त सरसपणे अंगिकारली होती. महाराष्ट्रभर भाई उद्धवराव पाटील सरकारी एस. टी. बसनेच प्रवास करायचे, आपल्या मतदार संघाच्या संपर्कासाठी एस. टी. बस किंवा बैलगाडी यांचा वापर सरासपणे ते करत असत. भाई उद्धवराव पाटीलांनी त्यांच्या जीवनात साधेपणाला खूप महत्व दिले आहे. त्यामुळे स्वार्थ, सत्ता, पैसा यांचा मोह त्यांना कधीही स्पर्श करू शकला नाही.
भाई उद्धवराव पाटलांनी शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी सोसलेले कष्ट, हाल अपेष्टा या आज सुख- सोयींच्या जगामध्ये कोणीही विचार करू शकणार नाही आशाच होत्या. त्यांनी विधिमंडळात उपस्थित केलेल्या मुद्यांची दखल सरकारी पक्षाने घेतले नाही, असे कधीही झाले नाही. त्यांनी केलेली भाषणे ही आतिशय मुद्देसूद व अभ्यासपूर्ण असत, त्यांनी केलेला युक्तिवाद कोणालाही खोडणे शक्य नसे. त्यामुळे त्यांच्या भाषणांची सरकारी पक्षाला नेहमीच धडकी भरलेली असायची देशाच्या राजकारणामध्ये पूर्णपणे सक्रीय असलेले नेते मा. शरद पवार भाई उद्धवरावांच्या भाषणाबद्दल एके ठिकाणी म्हणतात की, “एखादया माणसाला बोराटीच्या फांदीने झोडपल्यावर कशा वेदना होतात, तशा वेदना उद्धवरावांच्या भाषणाचे सरकारी पक्षाला व्हायच्या.” असे असले तरीही भाई उद्धवराव पाटलांचे भाषण सुरु असतांना सरकारी पक्षाचा कोणताही मंत्री किंवा खुद मुखमंत्री जातीने उपस्थित राहत असत. आणीबाणी आणि दुष्काळाच्या काळात भाई उद्धवरावांचे विराट रूप महाराष्ट्रासह देशाने पहिले आहे. त्यांचे हे कार्य आजच्या तरुण पिढीसमोर नव्याने मांडणे व त्यांना समजावून सांगणे खूप गरजेचे आहे. तसेच वर्तमानातील राजकारण्यांनी विधिमंडळात कसे युक्तीवाद करावे किंवा अभ्यासपूर्ण मत कसे मांडावे, यासाठी त्यांनी भाई उद्धवराव पाटलांची अभ्यासपूर्ण भाषणे वाचण्याची खूप गरज आहे. आशा या महान व्यक्तीमत्वाची व त्यांच्या आचार-विचारांची देशाला आज नितांत गरज असल्याचे दिसून येते.