नव तेजस्विनी महोत्सव 2025 : महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन आणि मार्गदर्शन सत्राचा यशस्वी समारोप

नव तेजस्विनी महोत्सव 2025 : महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन आणि मार्गदर्शन सत्राचा यशस्वी समारोप

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), नाशिकच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त "नव तेजस्विनी महोत्सव 2025" या तीन दिवसीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

समारोप समारंभात प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून स्वामी समर्थ केंद्र, दिंडोरीचे परमपूज्य आबासाहेब मोरे, बँक ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक मा. श्री लवाटे, तसेच ICICI बँकेचे विभागीय अधिकारी वैभव भाटिया हे मान्यवर उपस्थित होते.

मोरे दादा यांनी महिलांना उद्देशून सांगितले की, "बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करणे ही सकारात्मक पावले आहेत. जसे झाडाला फळ यायला वेळ लागतो, तसेच व्यवसायाला स्थैर्य मिळण्यासाठी संयम आणि योग्य नियोजन आवश्यक आहे. केवळ स्टॉल लावून विक्री होत नाही, तर उत्पादनाची योग्य मार्केटिंग करावी लागते."

बँक ऑफ महाराष्ट्रचे LDM लवाटे सर यांनी महिला उद्योजकांसाठी उपलब्ध योजनांची माहिती दिली आणि "सक्षम नारी, समृद्ध नारी" या विषयावर मार्गदर्शन केले.

महिला सशक्तीकरणाच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जेंडर व न्यूट्रिशन घटका अंतर्गत "तिरंगा थाळी स्पर्धा", सामाजिक विषयांवर आधारित रांगोळी स्पर्धा तसेच गायन व नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्यांना सन्मानचिन्ह व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या तीन दिवसीय प्रदर्शनात महिला बचत गटांच्या स्टॉल्सना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ६ लाख रुपयांपर्यंत विक्री झाली, यामुळे महिला उद्योजकांना आर्थिक स्थैर्य मिळवण्यास मदत झाली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात मा. श्री संजय गायकवाड (जिल्हा समन्वय अधिकारी, माविम नाशिक) यांनी नव तेजस्विनी प्रकल्पाचा उद्देश स्पष्ट केला.
सूत्रसंचालन श्रीमती अंजली वाढघुळे (व्यवस्थापक, कळवण CMRC) यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश थोरात (एमआयएस, माविम नाशिक) यांनी केले.

यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अनुराधा मॅडम, ICICI बँकेचे निलेश सपकाळ सर, लेखाधिकारी नितीन खोडके, कार्यक्रम अधिकारी युवराज उखाडे, जिल्हा प्रकल्प सल्लागार राजेंद्र धनाड, एमआयएस सल्लागार निलेश थोरात, तसेच ग्रामीण रुग्णालय दिंडोरीचे प्रतिनिधी, CMRC व्यवस्थापक, सहयोगिनी, महिला बचत गटातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नव तेजस्विनी महोत्सव 2025 हा महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी एक प्रभावी मंच ठरला. या माध्यमातून महिलांना व्यवसाय विकास, वित्तीय साक्षरता आणि बाजारपेठ कशी मिळवावी याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. या यशस्वी उपक्रमामुळे महिला उद्योजकांसाठी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.