डॉ.शहाणे बंधूंचे लिखाण संशोधकांसाठी उपयुक्त : केंद्रीय मंत्री ना. रक्षाताई खडसे

डॉ.शहाणे बंधूंचे लिखाण संशोधकांसाठी उपयुक्त : केंद्रीय मंत्री ना. रक्षाताई खडसे

नाशिक ( प्रतिनिधी) प्रा.डॉ. राजेंद्र शहाणे आणि प्रा.डॉ.कृष्णा शहाणे यांनी लिहिलेल्या "संशोधन पद्धतीच्या मूलभूत संकल्पना" या अंशुल पब्लिकेशन नागपुर यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय  क्रीडा आणि युवक कल्याण राज्य मंत्री नामदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नामदार रक्षाताई खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणीताई खडसे, माजी अर्थ व महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचे स्वीय सचिव योगेश कोलते, प्राचार्य डॉ.कृष्णा शहाणे, डॉ. राजेंद्र शहाणे, डॉ. शिवचरण उज्जैनकर, गणेश कोळी, सार्थक शहाणे, डॉ.प्रीती शहाणे, डॉ. जयश्री शहाणे आदी उपस्थित होते.

बिटको महाविद्यालय नाशिक रोड येथील प्रभारी प्राचार्य आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.कृष्णा शंकर शहाणे आणि त्यांचे बंधू बी.वाय.के. महाविद्यालयातील प्रा.डॉ. राजेंद्र शंकर शहाणे यांनी संयुक्तरीत्या लिहिलेल्या अर्थशास्त्रावरील 16 व्या पुस्तकाचे प्रकाशन मुक्ताईनगर, जिल्हा जळगांव येथे झालेल्या एका खास समारंभात नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी विचार व्यक्त करतांना नामदार रक्षाताई खडसे म्हणाल्या की, "संशोधन पद्धतीच्या मूलभूत संकल्पना" हे डॉ. शहाणे बंधूंचे पुस्तक प्रसिद्ध झाले ही अभिनंदनिय बाब आहे. आजच्या युगात संशोधन हा सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे. 

कोणत्याही क्षेत्रात प्रगल्भतेकडे वाटचाल करण्यासाठी संशोधन महत्वाचे आहे. तसेच संशोधनातून स्पर्धाक्षमता वाढण्यास मदत होते असे प्रतिपादन नामदार रक्षाताई खडसे यांनी केले. डॉ. शहाणे बंधूंचे  लिखाण हे विद्यार्थी, अभ्यासू - जिज्ञासू

यांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल तसेच यापुढेही डॉ.शहाणे बंधूंच्या हातून आणखी लिखाण व्हावे यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.