के व्ही एन नाईक सिन्नर महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सव 2025- 26 उत्साहात संपन्न

के व्ही एन नाईक सिन्नर महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सव 2025- 26 उत्साहात संपन्न

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे बुधवार दि. 4/2/2026 रोजी "सांस्कृतिक महोत्सव " व गुरुवार दि. 5/2/2026 रोजी "पारितोषिक वितरण समारंभ" मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन कवी श्री किरण भावसार यांच्या हस्ते संपन्न झाले . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संचालक मा श्री समाधान गायकवाड यांनी भूषवले. कार्यक्रमाचे उद्घाटक कवी श्री किरण भावसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या कवितांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले व विद्यार्थ्यांना सांस्कृतिक महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी देखील आपल्या प्राचार्य मनोगता मधून सांस्कृतिक उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सर्वांना शुभेच्छा दिल्या, तसेच आपल्या अध्यक्षीय मनोगता मधून संचालक श्री समाधान गायकवाड यांनी हे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असल्याचे नमूद केले. 

या कार्यक्रमातील नृत्य अविष्कारांचे परीक्षण प्रा. संदीप भाबड (प्रभारी प्राचार्य दोडी महाविद्यालय) व प्रा. वैशाली रिपोटे (सहाय्यक प्राध्यापक एस एस के कॉलेज नायगाव) यांनी केले. 

यावेळी एकाहून एक सरस असे  विविध प्रकारचे 38 नृत्याविष्कार विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक समन्वयक स.प्रा. पुनम कुटे यांनी केले तर सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. मंगल सांगळे व क्रीडा विभाग प्रमुख स.प्रा. अमोल आव्हाड यांनी केले.

 पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री सौ जयश्री वाघ तसेच श्री दत्तात्रय डोंगरे (माजी मुख्याध्यापक भिकूसा हायस्कूल) श्री गोकुळ आंधळे (संचालक, सह्याद्री करिअर अकॅडमी) डॉ.आर.आर. बोडके तसेच संस्थेचे विश्वस्त श्री नामदेवराव काकड, संस्थेचे संचालक श्री समाधान गायकवाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे विश्वस्त श्री नामदेवराव काकड यांनी भूषवले. 

यावेळी कवयित्री  सौ. जयश्री वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या काव्य शैलीतून व मार्मिक शब्दातून विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयाचे कौतुक केले. तसेच श्री दत्तात्रय डोंगरे सर यांनी देखील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रातिनिधिक नृत्यविषकारांचे कौतुक करत यामधूनच विद्यार्थ्यांची गुणवत्ता दिसून येत असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. आर.आर.बोडके यांनी देखील महाविद्यालयाचे व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक करत ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले नसेल त्यांनी पुढच्या वर्षी पारितोषिक मिळवण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून श्री नामदेवराव काकड यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. 

यावेळी शैक्षणिक,क्रीडा,कला, सामाजिक या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी केले तर सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख स.प्रा. अमोल आव्हाड व विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. ज्योती गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.