पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) – पुनर्रचित योजनेची नाशिक शहरात अंमलबजावणी

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) – पुनर्रचित योजनेची नाशिक शहरात अंमलबजावणी

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) पुनर्रचित योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असुन या योजनेचा पथविक्रेत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

 पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) पुनर्रचित योजनेचा उद्देश शहरातील पथविक्रेत्यांना सुलभ कर्ज सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे.

या योजनेअंतर्गत पात्र पथविक्रेत्यांना प्रथम टप्प्यात रुपये १५,०००/- पर्यंत, द्वितीय टप्प्यात रुपये २५,०००/- पर्यंत आणि तृतीय टप्प्यात रुपये ५०,०००/- पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. तसेच या कर्जावर केंद्र शासनाकडून ७% पर्यंत व्याज अनुदान देण्यात येत असून, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त लाभ दिले जातात. योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना क्रेडिट कार्ड सुविधा, डिजिटल व वित्तीय साक्षरता प्रशिक्षण तसेच विविध शासकीय योजनांशी जोडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या योजनेची अंमलबजावणी सुलभ व पारदर्शक पद्धतीने करण्यात येत असून अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांना डिजिटल ऑनबोर्डिंग, UPI व QR कोड सुविधा तसेच जलद कर्ज वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. याशिवाय, सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांशी जोडण्याचे कार्यवाही करण्यात येत आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध बाजारपेठ, आठवडी बाजार व गर्दीच्या ठिकाणी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत असून या शिबिरांमध्ये अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रांची तपासणी व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शहरातील सर्व पात्र पथविक्रेत्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी राजीव गांधी भवन, पीएम स्वनिधी विभाग, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांच्याशी संपर्क साधावा.