राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी
धुळे येथे दि. २० ते २२ मार्च २०२६ दरम्यान महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आणि धुळे जिल्हा ज्यूदो अमॅच्युअर असोसिएशन यांच्या वतीने ५२ वी कॅडेट गटाची राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून सुमारे २३० खेळाडूंनी सहभाग घेतला. सदर स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते झाले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक पराग अहिरे तसेच महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश टिळक, सचिव दत्ता आफळे, खजिनदार रवींद्र मेतकर, सतीश पहाडे, गणेश शेटकर, योगेश धाडवे उपस्थित होते. निखिल सुवर्णा यांनी स्पर्धा संचालक म्हणून काम पाहिले.
या स्पर्धेत नाशिकच्या एकूण ९ ज्यूदो खेळाडूंनी सहभागी होत विविध वजन गटात पदके जिंकत २ सुवर्ण आणि ३ कांस्य पदके पटकावली. या स्पर्धेत धनश्री गरकळ हिने ४८ किलोखालील वजन गटात एकूण ४ सामने जिंकले आणि अंतिम सामन्यात यवतमाळच्या अनुश्री कायंडे हिचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकले तर कस्तुरी शिंदे हिने ५२ किलोखालील वजन गटात ४ सामने जिंकले तसेच अंतिम सामन्यात सातारच्या जान्हवी बाबर हिचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले. तसेच वैभवी आहेर, सई जगताप, वैष्णवी मोरे यांनी कांस्य पदक पटकावले. तर सार्थक चव्हाण, साई मुंढे, यश पवार, सृष्टी देसले यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपापल्या वजन गटात सहभाग नोंदवला.
सदर स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते धनश्री गरकळ आणि कस्तुरी शिंदे यांची पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी संघाने विजयी संघाचा चषक जिंकला तर मुंबई संघाने द्वितीय आणि कोल्हापूर संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत नाशिकचे योगेश शिंदे आणि स्वप्निल शिंदे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
नाशिकच्या संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून सुहास मैंद यांनी काम पाहिले.
सदर खेळाडूंचे नाशिक जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे सचिव रत्नाकर पटवर्धन, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, रविंद्र मेतकर, ज्यूदो प्रशिक्षक विजय पाटील, माधव भट, स्वाती कणसे, तुषार माळोदे आदींनी अभिनंदन केले.

digitalnashik_admin




