बिटको महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न

बिटको महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न

दि.३ जानेवारी २०२५

बिटको महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न  ....

* भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर काव्य करंडक केडीएसपी  कृषी महाविद्यालयातील संघाने पटकावला *

 नाशिकरोड : " सिद्धी आणि प्रसिद्धी या दोन साधना असून आपले काम प्रामाणिकपणे करून पुढे वाटचाल करा. जिद्द, चिकाटी, मेहनत आपल्याला योग्य स्थानावर  घेऊन जातील. काव्य प्रतिभा माणसाची मिरासदारी असते.आदर्श व्यक्तींचे कार्य गुण आपल्या अंगी आणा. सामाजिक जाणीवेची कविता तयार करा लिहिते व्हा, व्यक्त व्हा ," असे  मुंबई येथील सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक योगीराज बागुल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

         गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालय व फुले - आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन ( फासा) यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आंतरमहाविद्यालयीन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ' राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा ' महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली. त्याप्रसंगी  प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर श्री. योगीराज बागुल यांच्यासह परीक्षक डॉ. योगेश वानखेडे व डॉ. संदीप तपासे , मराठी विभाग प्रमुख डॉ. के. एम. लोखंडे, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.मंजुषा कुलकर्णी या होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. डॉ. के एम लोखंडे यांनी स्पर्धेविषयी माहिती देऊन स्वागतपर प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.शरद नागरे यांनी केला. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  नावाने सदर राज्यस्तरीय काव्य करंडक स्पर्धा आयोजनाचे हे २७ वे वर्ष असून स्त्री ही शक्ती असून तिची अस्मिता फक्त पुरुषांच्या संदर्भात मर्यादित नसून तिचे स्वातंत्र्य समाज घडण्यासाठी आवश्यक आहे तसेच सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणासह शोषण विरहित समाज निर्मितीच्या कार्यात महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. अनिष्ट रूढी,  परंपरा, जातिभेद विरोधात आवाज उठवून सामाजिक चळवळीचा पाया घातला. हा काव्यकरंडक नवकवींना नेहमीच नवीन कविता रचण्यासाठी स्फूर्ती व प्रेरणा देईल ," असे सांगितले . याप्रसंगी विविध महाविद्यालयातून एकूण ९ संघातील १६ विद्यार्थ्यांनी  सहभागी होऊन आपल्या कविता सादर केल्या.

        सकाळच्या उद्घाटन सत्रात प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्या अध्यतेखाली , कला विभागाचे उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार पठारे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.  आकाश ठाकूर, परीक्षक प्रा. डॉ. योगेश वानखेडे,  डॉ. संदीप तपासे, मराठी विभागप्रमुख डॉ. के. एम. लोखंडे स्पर्धाप्रमुख प्रा.आर.बी. बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कु. नेहा आहेर, ममता महाजन यांनी स्वागत गीत सादर केले. गणेश कसबे याने भीमगीत सादर केले तर सावित्री गीत दर्शन अभंग याने सादर केले. प्रा.डॉ. शरद नागरे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला . स्पर्धेचे परीक्षण पंचवटी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. योगेश वानखेडे व कवी डॉ. संदीप तपासे यांनी केले. याप्रसंगी परीक्षक योगेश वानखेडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ' आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. कवितांच्या माध्यमातून साहित्य पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे. प्रत्येक स्पर्धा ही खिलाडूवृत्तीने घ्यावी.काव्यवाचन सादर करणे एक कौशल्य असून ते सादर करण्यास साठी आपले व्यक्तिमत्व विकासात अमुलाग्र बदल होण्यासाठी अशा  काव्य स्पर्धांत सहभागी होऊन व्यक्त व्हा, आज शिक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. काव्य कला प्रकटीकरण मनाला जोडणारी असते,' असे सांगितले. यावेळी प्रा. डॉ. सुनीता रणाते यांनी सावित्री काव्य सादर केले . त्यानंतर ग्रंथालयात झालेल्या ' वाचन - संकल्प महाराष्ट्राचा ' या कार्यक्रमात योगीराज बागुल यांनी ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन केले.  याप्रसंगी ग्रंथपाल एस. व्ही.  पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत केले. तसेच प्रा. दिनेश बोबडे यांनीही  स्वरचित कविता सादर केल्या.

स्पर्धेतील विजेते व सादर केलेली कविता खालील प्रमाणे :

 राज्यस्तरीय फिरता काव्य चषक विजेता संघ :-

अथर्व विश्वास केळकर - शांतता ठेवा, युवक झोपला आहे, वैष्णवी सुभाष देवरे - कृषी राष्ट्र ( केडीएसपी कृषी महाविद्यालय, नाशिक )

  •  प्रथम पारितोषिक ( रु.५०००/-) - पवन परमेश्वर शेळके - तृतीयपंथी ( एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर )
  •  द्वितीय पारितोषिक ( रु.३०००/-) पवन परमेश्वर शेळके महापुरुष कळतील का ? ( एमजीएम विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर )
  •  तृतीय पारितोषिक (रु.२०००/-) - पार्थ रामदास भेंडेकर - रणरागिणीचा वारसा ( फर्ग्युसन कॉलेज, पुणे )

  सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. 

        स्पर्धेचे सूत्रसंचालन डॉ.उत्तम करमाळकर व डॉ. आरती गायकवाड यांनी केले तर आभार प्रा.राजेश बागुल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.शरद नागरे,  प्रा. वृषाली उगले, प्रा.डॉ.आरती गायकवाड , प्रा. डॉ. गीतांजली चिने, प्रा.मीना गिरडकर , प्रा. अमर ठोंबरे, प्रा राजाराम तराळ यासह विद्यार्थी प्रतिनिधी -गौतम निरभवणे, विद्यार्थिनी प्रतिनिधी - समृद्धी गायकवाड फासा संघटना नाशिक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मराठी विभागातील विद्यार्थी यांनी प्रयत्न केले . कार्यक्रमास सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.