श्रमसंस्कार शिबिर व्याख्यानमाला बातमी

श्रमसंस्कार शिबिर व्याख्यानमाला बातमी
समाज विकासात वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा
                   लोणवाडी येथील क. का. वाघ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिरातील व्याख्यानमालेत सेवानिवृत्त  प्राचार्य डॉ. टी. आर. गोराणे यांचे प्रतिपादन 
पिंपळगाव बसवंत २४.१.२०२४  
          तुमच्याकडे गुणवत्ता, नैतिकता असल्याशिवाय समाजात परिवर्तन होणार नाही.  यासाठी तुम्ही कोणतीही घटना ही अनुमान, निष्कर्ष, निरीक्षण, तर्क आणि प्रयोग या गोष्टींवर तपासून पाहिली पाहिजे. तरच त्या घटनेतील वास्तव समाजासमोर येते. यासाठी समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे, असे प्रतिपादन  सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. टी. आर. गोराणे यांनी केले. ते लोणवाडी या गावात कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव बसवंत आयोजित राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिरात आयोजित 'वैज्ञानिक दृष्टिकोन' या विषयावर व्याख्यानात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  रासोयो कार्यक्रम अधिकारी प्रा. संपत खैरनार, प्रा. डॉ. दत्तात्रय फलके, प्रा. सचिन कुशारे, प्रा. अजित देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. गोराणे यांनी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेले अंधश्रद्धे बद्दलचे गैरसमज काही वैज्ञानिक प्रयोगाच्या माध्यमातून घालवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मनातील ओळखणे, पाण्यावर दिवा लावणे, जागरण गोंधळातील साखळी तोडणे, तांब्यात असलेले पाणी गुप्त करणे. आधी प्रयोगांच्या माध्यमातून या प्रयोगामागील वैज्ञानिक दृष्टिकोन कसा दडलेला आहे याचा उलगडा त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांशी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून हितगुज केले. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आलेल्या शंकांचे निरसन केले. विद्यार्थ्यांना आवाहन करताना ते म्हणाले की, तुमच्या मनामध्ये कोणताही अंधश्रद्धे संदर्भातील प्रश्न मला तुम्ही माझ्या मोबाईल वरती कोणत्याही वेळेत विचारून आपल्या विचारांचे समाधान करू शकता. पण अंधश्रद्धेच्या आहारी कोणीही जाऊ नका असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
       यावेळी कार्यक्रमाचे आभार कुमारी प्रियंका गवळी व कुमारी खोडे गायत्री यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका गवळी या विद्यार्थिनीने केले. यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ -
लोणवाडी येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात व्याख्यान देताना सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. टी. आर. गोराणे यावेळी व्यासपीठावर  रासोयो कार्यक्रम अधिकारी प्रा. संपत खैरनार, प्रा. डॉ. दत्तात्रय फलके, प्रा. सचिन कुशारे, प्रा. अजित देशमुख व विद्यार्थी.