गोखले एज्युकेशन सोसायटीच्या १०७ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात सम्पन्न ..

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या १०७ व्या वर्धापन दिनानिमित्त  कार्यक्रम उत्साहात सम्पन्न ..

नाशिक : " मानवाचे खरे भांडवल आनंदी आणि सुखी असणे हेच खरे जीवन असून मानवाचे खरे वैभव वनस्पतीत आहे. निसर्गापासून आपण काय व किती घ्यावे शेतकरी व प्राण्यांकडून शिकावे. देशाची प्रगती व उन्नती गुणवत्तापूर्वक शिक्षणावर अवलंबून असून यात कुशल व प्रशिक्षित शिक्षकांची भूमिका मोलाची आहे. भारताची गुरु -शिष्य परंपरा ही जगात उत्कृष्ट आहे. शहरात मुलांना शिक्षण देण्यासाठी अनेक संस्था आहेत पण गोखले एज्युकेशन संस्थेने ग्रामीण भागातही शिक्षणाची गंगोत्री आणून एक अलौकिक गगनभरारी घेतली आहे, " असे शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्रविभागाचे संशोधक डॉ. एस. आर. यादव यांनी सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त करताना केले.

        गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक या संस्थेचा १०७ वा वर्धापन दिन दि. १९ फेब्रुवारी रोजी संस्थेच्या गुरुदक्षिणा सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील वनस्पती शास्त्र विभागाचे ज्येष्ठ संशोधक डॉ. एस. आर. यादव प्रमुख पाहुणे तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव व खजिनदार डॉ. दीप्ती देशपांडे होत्या. तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. पी. देशपांडे, प्रकल्प संचालक डॉ. पी. एम. देशपांडे, आस्थापना संचालक शैलेश गोसावी, स्टाफ अकॅडेमी चेअरमन डॉ. अंजली कुलकर्णी, पुणे येथील फर्ग्यूसन कॉलेजच्या माजी वनस्पती शास्त्र विभागाच्या प्रा.डॉ.उषा यादव, चेअरमन डॉ. सुहासिनी संत, क्वालिटी आणि सिस्टीम डायरेक्टर अक्षय देशपांडे, विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, एचपीटी कॉलेज प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

       प्रारंभी एसएमआरके महाविद्यालयाच्या संगीत विभागवतीने स्वागतगीत सादर केले. तसेच सोसायटी गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा व  देणगीदार यांचा स्वागत व सत्कार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून मान्यवरांचा परिचय डॉ. सुहासिनी संत यांनी केला . याप्रसंगी डॉ. एस. आर. यादव यांना  संस्थेच्या सचिव डॉ. सौ. दिप्ती देशपांडे यांच्या हस्ते सर डॉ. मो. स. गोसावी एक्सलन्स पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन डॉ. प्रणव रत्नपारखी यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते एज्युकेशन सोसायटी प्रोफाइल, स्वयंप्रकाश, स्वयंप्रेरणा,  ज्ञानपर्व,  रेजोनन्स या संशोधनपर नियतकालिकांच्या अंकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच संस्थेच्या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या ' स्पेक्ट्रम ' या वार्षिक अंकाचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

         विशेष अतिथी उद्योजक संतोष मंडलेचा यांनी मनोगत व्यक्त करतांना नाशिकमधील उद्योजकांच्या 3 पिढ्या या संस्थेने घडविल्या. समाजातील सर्व स्तरातील राष्ट्र विकासासाठी आदर्श नागरिक घडवीणारी, दर्जेदार गुणवत्तापूर्वक शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. संस्थेचे कार्य केवळ शहरी भागापुरता मर्यादित नसून ग्रामीण व आदिवासी भागातील मुलांसाठी पण अव्याहत  सुरु आहे याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले.

          अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. दीप्ती देशपांडे यांनी संस्थेत आज एक लाखावर विद्यार्थी शिक्षण घेत असून तीन हजारावर स्टाफ कार्यरत आहेत. विद्यार्थ्याला पुस्तकी ज्ञान असणे तर आवश्यक आहेच पण प्रत्येक विद्यार्थी हा राष्ट्राचा भाग्यविधाता आहे. त्यामुळे त्याला उत्कृष्ट नागरिक घडवणे ही शिक्षक व प्राध्यापकांची जबाबदारी आहे. या संस्थेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले उल्लेखनीय योगदान देत आहेत. समाजातील शेवटच्या विद्यार्थ्यालाही उच्च शिक्षणाची आणि यशस्वी करिअरची संधी मिळायला हवी या ध्येयाने संस्थेची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले.

        त्याचप्रमाणे वर्धापन दिनानिमित्त संस्थेतील पीएचडी धारक, उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट कर्मचारी, उत्कृष्ट वार्षिक अंक आणि उत्कृष्ट संस्था असे पुरस्कार वितरित करण्यात आले. कार्यक्रमास  जयवंत कुलकर्णी, गौतमशेठ क्षत्रिय, जयंत जायभावे, माजी प्राचार्य डी . के. गोसावी, डॉ. के. आर. शिंपी, एच. आर. कडेपूरकर,  यासह गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर. एच. सपट इंजिनिअरिंग कॉलेज, मॅनेजमेंट कॉलेज तसेच विविध शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य यासह शिक्षक, प्राध्यापक, विभाग प्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ स्नेहा रत्नपारखी व डॉ. मुग्धा जोशी यांनी केले तर आभार विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन उपप्राचार्या डॉ. लीना भट यांनी केले.