महाराष्ट्र वृक्ष वेलींनी बहरावा माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र वृक्ष वेलींनी बहरावा  माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचे प्रतिपादन

नरसी नामदेव (हिंगोली) ते पंढरपूर दरम्यान वृक्ष,संत साहित्य,शेतकरी या विषयावर जनमानसात जागृती करणे यासाठी महाराष्ट्रातील  शिक्षक,साहित्यिक, समाजशील तरुण गेल्या अनेक वर्षापासून निसर्ग शाळेच्या माध्यमातून वृक्ष, पाणी, हवा, आदि पर्यावरण संदर्भात जनजागृती करीत आलेले आहेत. याचाच एक भाग म्हणून उन्हाळी सुत्याच्या काळात लोक प्रबोधन करण्यासाठी ह्या निसर्गप्रेमी शिक्षकांनी  ३ मे पासून पायी  वृक्ष दिंडी आयोजित केली होती.हि दिंडीचा प्रारंभ संत नामदेव महाराज यांचे जन्मगाव नरसी (जिल्हा हिंगोली ) येथे सुरु करून समारोप नुकताच (दिनांक १९ मी रोजी ) पंढरपूर येथे करण्यात आला. चारशे किलोमीटरचे  अंतर पाच जिल्ह्यातून पायी प्रवास करत ३८ गावांना भेट देत दिंडीने मार्गक्रमण केले. 

वृक्ष लागवड,संतांचे पर्यावरण संबंधी विचार, शेतकऱ्याची आर्थिक उन्नती, विषमुक्त अन्न ,पारंपरिक भाजीपाला जतन, शास्वत ग्राम विकास  आदी बाबत जनजागृती करत ह्या दिंडीने प्रवास केला. गावोगावी बियांचे वाटप करून आषाढी एकादशीला भेट दिलेल्या गावांना विठ्ठलाच्या नावे "विठ्ठलाचे झाड" लावण्याचे आवाहन करण्यात आले. दिनांक १९ मे रोजी विठ्ठलाच्या दर्शनाने दिंडीची सांगता करण्यात आली. सांगता समारंभ गुरू माऊली गुरुकुल पंढरपूर येथे संपन्न झाला. सांगता समारंभाचे अध्यक्ष म्हणून माऊली गुरुकुल चे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली पवार हे होते तर उद्घाटक माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे होते. सोलापूरचे महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांची विशेष उपस्थिती होती.  सुरेश पवार  प्रा. परमेश्वर झांबरे,उद्योजक शशिकांत कराळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वृक्षदिंडीतील सहभागी अणासाहेब  जगताप, कवी तथा  प्रकाशक डॉ. विनायक येवले प्राचार्य डॉ ज्ञानोबा ढगे, शेतकरी राजेश चव्हाण हे उपस्थित होते. पंढरपुरातील वृक्षप्रेमी मंडळी व संस्कार शिबिरातील मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. 

याप्रसंगी बोलत असताना मा.आमदार दत्तात्रय सावंत यांनी आपले वृक्ष लागवडीचे अनुभव सांगितले. मुलांच्या निरोगी जगण्यासाठी शिक्षकच अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकतो. शिक्षक आमदार असताना मी वेगवेगळ्या विषयावरती काम केले त्याचवेळी प्रत्येक शिक्षकाला एक फळ झाड भेट दिल्याची आठवण त्यांनी सांगितली. उन्हाचा पारा चढलेला असताना  शिक्षकांनी शेतकरी वृक्ष व संत साहित्याला अनुसरून काढलेली दिंडी ही महत्त्वाचा संदेश देते असेही ते म्हणाले. याप्रसंगी महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी काळाची गरज म्हणून आपण सर्व सुशिक्षितांनी एकत्र येऊन वृक्ष लागवडी या विषयाकडे गांभीर्याने बघायला हवे असे सांगितले.  वृक्ष दिंडीचे प्रवर्तक अणासाहेब जगताप यांनी दिंडीतील अनुभव सांगितले. शशिकांत कराळे,सुरेश पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

दिंडीच्या वतीने गुरुकुलातील विद्यार्थी व उपस्थितांना लाल हादगा, समिंदर शोक, बहावा  आदी भाजीपाला,फळ झाडे, देशी वृक्षांच्या बियाचे वाटप करण्यात आले. मुलांनी रोपवाटिका कशा कराव्यात यावरती मार्गदर्शन करण्यात आले. या आषाढी एकादशीला सोलापूरकरांनी व पंढरपूरकरांनी एकत्र येऊन आपली ओळख असलेल्या विठ्ठलाच्या गावात विठ्ठलाचे झाड लावावेत. प्रत्येक वारकऱ्यांनी आपल्या शेतात दीर्घकाळ टिकणाऱ्या फळ झाडाची लागवड करावी व त्या वृक्षाला विठ्ठलाचे झाड म्हणून वाढवावे असे वृक्षदिंडीच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले.

 प्रत्येक गावाने आपल्या गावात एकत्र येऊन आपल्या मुलांच्या आई-वडिलांच्या किंवा पूर्वजांच्या नावाने एक ट्री गार्ड तयार करून त्या ट्रीगार्ड वरती ' विठ्ठलाचे झाड ' नाव टाकून खाली आपल्या मुलांची नावे टाकावीत. एक दीर्घकाळ टिकणारे फळझाड त्यात लावावे. पुढील काळात मुले ही झाडं जोपासतील. गावाच्या सुरुवातीलाच विठ्ठलाचे झाड मोठी होतील  तर शेतात विठ्ठलाचे झाड जेव्हा फळा फुलांनी बहरेल तेव्हा त्यातच  आपण झाडाचाच विठ्ठलाला बघूयात अशी विनंती  वृक्षदिंडीच्या पदाधिकाऱ्यामार्फत करण्यात आली.

मान्यवारांचे हस्ते वृक्ष दिंडीतील सहभागी अण्णासाहेब जगताप(परभणी) डॉ विनायक येवले(नांदेड) प्राचार्य डॉ ज्ञानोबा ढगे(नाशिक) श्री राजेश चव्हाण(हिंगोली) यांचा सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह भ प सच्चिदानंद महाराज यांनी केले तर आभार    प्रा परमेश्वर झांबरे यांनी मानले.