सर्व विषयातील विविधता जाणून खऱ्या अर्थाने माणूस होण्याच्या स्पर्धेत भाग घ्या - प्रा. डॉ. वंदना नाडे

सर्व विषयातील विविधता जाणून खऱ्या अर्थाने माणूस होण्याच्या स्पर्धेत भाग घ्या - प्रा. डॉ. वंदना नाडे

नाशिकरोड:

रसायनशास्त्रातील सर्वोच्च संस्था इंटरनॅशनल युनियन आँफ प्युअर अँड अप्लाईड केमिस्ट्री यांच्या वतीने 'ग्लोबल वुमेन्स ब्रेकफास्ट २०२६' या आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाच्या अंतर्गत 'अनेक आवाज, एक विज्ञान' या संकल्पनेवर गोखले एज्युकेशन सोसायटीचे बिटको कॉलेज, नाशिकरोड येथील रसायनशास्त्र विभाग, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कॉलेज ऑफ फार्मसी, नाशिक आणि असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स यांचे संयुक्त विद्यमाने सेमिनारचे आयोजन दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी कॉलेज ऑफ फार्मसी, नाशिक येथील सेमिनार हॉल मध्ये करण्यात आले होते. या सेमिनारसाठी कॉलेज ऑफ फार्मसी, नाशिक मधील कार्यरत प्रमुख दोन मार्गदर्शक प्रा डॉ. वंदना नाडे आणि प्रा डॉ मृदुला बेळे या होत्या. 

प्रा डॉ. वंदना नाडे या मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की रसायनशास्त्र म्हणजे फक्त रसायनांची अभिक्रिया असे न समजता आपली स्वप्ने आणि ध्येय यांच्या पूर्तीसाठी केली जाणारी धडपड होय. सद्यपरिस्थितीत शिक्षणामध्ये महिलांचे प्रमाण वाढलेले असले तरी महिलांचे देशाच्या जीडीपी वाढीसाठीचे योगदान कमी असल्याचे दिसते. समाजाने सामूहिक शहाणपण गमावले असून झुंडशाहीचे प्रमाण वाढले आहे. सर्व विषयातील सर्व विविधता जाणून घेवून खऱ्या अर्थाने माणूस होण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायला हवा. स्वतः स्वतःला प्रेरित करून शिस्तबद्ध झाल्यास स्वतःची प्रगती करता येईल. 

प्रा डॉ मृदुला बेळे म्हणाल्या की महिलांना ध्येय साध्य करण्यासाठी महिलांमधीलच एखाद्या रोल मॉडेलची आवश्यकता आहे. यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतांना परत परत अनेकवेळा शून्यातून सुरुवात करावी लागते आणि नेमकी हीच शून्यातून सुरुवात करण्याची प्रक्रिया विज्ञान शिकवते. प्रयोगशाळेच्या पलीकडे विचार करणे आवश्यक असून विविधतेतील एकमेकांच्या आवाजाला पाठिंबा देणे गरजेचे आहे.

कॉलेज ऑफ़ फार्मसी, नाशिकचे उपप्राचार्य प्रा डॉ मिलिंद वाघ यांनी उपस्थितांचे स्वागत करून या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. या सेमिनारचे संयोजक, असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स या संस्थेचे पश्चिम विभागीय सचिव व बिटको कॉलेज, नाशिकरोड येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ सुदेश घोडेराव यांनी सेमिनारचे प्रास्ताविक करतांना ग्लोबल वुमेन्स ब्रेकफास्ट संकल्पना, असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स आणि नाशिकरोड महाविद्यालय या संस्थांच्या कार्याचा आढावा घेतला. 

सेमिनारचे सूत्रसंचालन आणि वक्त्यांचा परिचय जया तुपे या विद्यार्थिनीने तर आभार प्रदर्शन प्रा डॉ वाल्मिक जोंधळे यांनी केले. या सेमिनारच्या यशस्वीतेसाठी कॉलेज ऑफ फार्मसी, नाशिकचे प्राचार्य डॉ दिलीप डेर्ले, उपप्राचार्य घनश्याम जाधव, बिटको कॉलेज, नाशिकरोडचे प्रभारी प्राचार्य डॉ कृष्णा शहाणे, सायन्स विभागाचे उपप्राचार्य प्रा डॉ सतीश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे ५० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक या सेमिनारसाठी उपस्थित होते.