सिन्नर पोलीस स्टेशनला विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट

सिन्नर पोलीस स्टेशनला विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट

कायदा व सुव्यवस्थेची प्रत्यक्ष माहिती; स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन

सिन्नर, ता. सिन्नर: क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर येथील राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सिन्नर पोलीस स्टेशन येथे शैक्षणिक भेट देत पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

या भेटीदरम्यान ए.पी.आय. चव्हाण मॅडम, पी.एस.आय. पाटील, पोलीस हवालदार बिडगर, महिला पोलीस दिपीका चव्हाणके व सुवर्णा डुंबरे तसेच सिन्नर शहरी व ग्रामीण भागातील उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना गुन्हे नोंदणी प्रक्रिया, कायदा व सुव्यवस्था राखण्यातील जबाबदाऱ्या, सायबर गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना आणि नागरिकांशी प्रभावी संवाद याबाबत सविस्तर माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून पोलीस विभागाच्या दैनंदिन कामकाजाविषयी जाणून घेतले. पोलीस यंत्रणेतील शिस्त, तत्परता आणि जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांना या भेटीतून झाली. विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही भेट मार्गदर्शक ठरली.

या उपक्रमाची संकल्पना राज्यशास्त्र विभाग प्रमुख स. प्रा. संतोष आव्हाड यांच्या पुढाकारातून राबविण्यात आली असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

या भेटीत राज्यशास्त्र विभागातील द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थी – निकिता सोनवणे, संजीवनी यादव, कांचन कुशारे, प्राजक्ता दराडे, ज्ञानेश्वरी गाडेकर, सुमन राजभहर, प्रियंका बर्डे, ईश्वर सांगळे, अजिंक्य बोडके, शुभम गांजवे, ओमकार रोंडे, साक्षी सांगळे, प्रियांका गोऱ्हे, यशोदा दिवे, वैष्णवी सानप तसेच स. प्रा. संतोष आव्हाड व स. प्रा. प्रशांत गायकवाड उपस्थित होते.