डॉ.शहाणे बंधूंचे लिखाण समाजासाठी उपयुक्त : डॉ . हरिप्रकाश शर्मा
नाशिक ( प्रतिनिधी) एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांच्या वतीने एम ए प्रथम वर्ष या वर्गासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या “बँकिंग अँड फायनान्शियल सिस्टीम” या इंग्रजी माध्यमातील प्रा.डॉ. राजेंद्र शहाणे आणि प्रा.डॉ.कृष्णा शहाणे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास फाउंडेशन नवी दिल्ली येथील (एन एच आर डी एफ) माजी सहसंचालक डॉ.हरिप्रकाश शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. हरिप्रकाश शर्मा यांनी डॉ. राजेंद्र शहाणे, प्राचार्य डॉ.कृष्णा शहाणे यांचा सत्कार केला. तर प्रमुख अतिथी म्हणून
राष्ट्रवादी शहर व जिल्हा कार्याध्यक्ष विक्रांत डहाळे, ललित महाजन ,सुनीला महाजन, श्रद्धा मइड, सार्थक शहाणे, सुनिता पाटील, ऋषिकेश अंबडकर आदी उपस्थित होते.
बिटको महाविद्यालय नाशिक रोड येथील प्रभारी प्राचार्य आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.कृष्णा शंकर शहाणे आणि त्यांचे बंधू बी.वाय.के. महाविद्यालयातील प्रा.डॉ. राजेंद्र शंकर शहाणे यांनी संयुक्तरीत्या लिहिलेल्या अर्थशास्त्रावरील 15 व्या पुस्तकाचे प्रकाशन नाशिक येथे झालेल्या एका खास समारंभात नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी विचार व्यक्त करतांना डॉ. शर्मा म्हणाले की, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांच्या वतीने डॉ. शहाणे बंधूंचे पुस्तक प्रसिद्ध झाले ही अभिनंदनिय बाब आहे. बँकिंग अँड फायनान्स हा सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे. विशेषतः समाजामध्ये असणारी आर्थिक विषमता कमी होण्यासाठी अर्थशास्त्राचे विचार महत्वाचे आहेत. अर्थशास्त्र या विषयात कायम संशोधन होणे गरजेचे आहे त्यातून समाजाची प्रगती होण्यास मदत होईल. भारतीय आणि जागतिक बँकिंग क्षेत्राचा मागोवा या पुस्तकातून अतिशय वास्तव रीतीने घेण्यात आलेला आहे. सदर पुस्तकातील विचार हे अर्थशास्त्राच्या आणि बँकिंग च्या अभ्यासकांना, उद्योजकांना व विद्यार्थीवर्गाला निश्चितच मार्गदर्शक ठरतील, तसेच यापुढेही डॉ.शहाणे बंधूंच्या हातून आणखी लिखाण व्हावे यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
त्यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की, डॉ. शहाणे बंधूंचे अर्थशास्त्राचे लिखाण हे अर्थशास्त्राच्या अभ्यासकांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. अशाच प्रकारचे लिखाण करण्यात त्यांनी सातत्य ठेवावे असे त्यांनी शहाणे बंधूंना सांगितले.

digitalnashik_admin




