व्यावसायिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता- डॉ. पी व्ही रसाळ
सामाजिक बांधिलकीतून शारीरिक क्षमता आणि भावनात्मक बुद्धिगुणांक मजबूत करून उच्च मनोबल, सकारात्मक व्यक्तिमत्व व सौंदर्य विषय क्षमता यांच्या मजबुतीतून व्यावसायिक कौशल्य प्राप्त करणे व व्यावसायिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सिन्नर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी व्ही रसाळ यांनी केले. ते आज खेडगाव येथील मविप्र संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा आराखडा तसेच अंमलबजावणी संदर्भात जनजागृती व शास्त्रशुद्ध माहितीसाठी शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांच्याकरिता आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत बीजभाषक म्हणून बोलत होते. शाश्वत विकासासाठी विविध कौशल्य प्राप्त करून व्यावसायिक सुरुवात करावी तसेच नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावे असेही सुतोवाच त्यांनी केले. सदर कार्यशाळेच्या औपचारिक उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणून महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सुरेश डोखळे उपस्थित होते. त्यांनी शैक्षणिक धोरणाचा आराखडा व त्याच्या अंमलबजावणी विषयी सर्वांनी सकारात्मक असावे जेणेकरून विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणाली चांगले कार्य करेल असे सुतोवाच केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एन कारे यांनी सदर कार्यशाळेचा उद्देश आपल्या प्रास्ताविकातून मांडला. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात व्ही एन नाईक महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. सुनील उगले यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा संपूर्ण आराखडा चित्रफितीसह सर्व शिक्षक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांपुढे मांडून त्यातील क्रेडिट्स व त्याच्या तांत्रिक बाजू स्पष्ट करून सांगितल्या. डॉ. रूपाली शिंदे यांनी बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या बाबी व आराखडा स्पष्ट केला.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात केटीएचएम महाविद्यालयातील डॉ व्ही बी बोरस्ते यांनी वाणिज्य शाखेतील नवीन शैक्षणिक धोरणानुसार असलेले विषय, डॉ एस के बिन्नोर यांनी कला शाखेतील विषय तर डॉ जी जी पाटील यांनी विज्ञान शाखेतील विषय याबद्दलचा सविस्तर आराखडा व त्याची अंमलबजावणी कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. पिंपळगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी टी ढगे यांनी शिक्षक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नवीन शैक्षणिक धोरणानुसार असलेली जबाबदारी व नवीन बदल स्वीकारण्याची तयारी याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी वरील मान्यवरांबरोबरच डॉ वाय एम साळुंखे, डॉ एस एस प्रसाद, कादवा कारखान्याचे प्राचार्य एन व्ही गवळी, खेडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन कारे, आयक्यूएसी समन्वयक डी के निकम, कार्यशाळा समन्वयक डॉ विठ्ठल जाधव, संयोजक डॉ विकास शिंदे समवेत दिंडोरी तालुक्यातील अन्य महाविद्यालयातील विभाग प्रमुख, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन सोनाली खरे व आभार प्रदर्शन योगिता गरुड यांनी केले.