राष्ट्रीय सेवा योजनेतून देशाच्या विकासास मदत : प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे

राष्ट्रीय सेवा योजनेतून देशाच्या विकासास  मदत : प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे

नाशिक (प्रतिनिधी) राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर श्रमदानाचे संस्कार रुजतात आणि यातून समाजाबरोबरच देशाचा विकास होण्यासाठी मदत होते असे प्रतिपादन बिटको महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी केले. 

बिटको महाविद्यालय नाशिक रोड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कोटमगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अरुण पगार आणि ग्रामविकास अधिकारी अरुण रौंदाळ उपस्थित होते. तसेच उपप्राचार्य डॉ.सतीश चव्हान यांचे मार्गदर्शन व उपस्थिती होती. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित आर.एन.सी. आर्टस्, जे.डी.बी. कॉमर्स आणि एन.एस.सी. सायन्स कॉलेज, नाशिकरोड (सी. बी. सी. महाविद्यालय) यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर २०२५–२६ कोटमगाव (ता. व जि. नाशिक) येथे उत्साहात व यशस्वीरीत्या नुकतेच पार पडले.

“शाश्वत विकासासाठी युवक : पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन” या संकल्पनेवर आधारित हे शिबिर कोटमगाव येथे आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराचे संयोजन प्रा. फारुख मुलाणी (कार्यक्रम अधिकारी, NSS), प्रो. डॉ. कांचन सनानसे (सहकार्यक्रम अधिकारी) व प्रा. राहुल उपळाईकर (सहायक कार्यक्रम अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या शिबिरात स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध व संघटित पद्धतीने सर्व उपक्रम पूर्ण केले.

शिबिरादरम्यान बंधारे बांधकाम, गाव सर्वेक्षण, परिसर स्वच्छता अभियान, कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, जलसंधारण व पाणी बचत जनजागृती असे पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले. तसेच आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर, किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य जनजागृती, व्यसनमुक्ती अभियान, स्त्री-पुरुष समानता, लोकसंख्या नियंत्रण, मतदान जनजागृती व पर्यावरण संवर्धन यांसारखे सामाजिक उपक्रम प्रभावीपणे पार पडले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी ग्रामस्थांची मने जिंकली.

याशिवाय युवक सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक बुद्धिमत्ता, जलसंवर्धन, महिला सबलीकरण व शाश्वत विकास या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. रस्ते सुरक्षा जनजागृती,महिला सबलीकरण, मतदान जनजागृती, स्वच्छता रॅली तसेच  “हेल्मेट फॉर लाईफ” मोहिमेद्वारे ग्रामस्थांमध्ये सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला.

शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे ,विविध विभागप्रमुख, कोटमगाव सरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ ,सर्व स्वयंसेवक यांच्या उपस्थित पार पडले.

या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, पर्यावरणीय जाणीव, नेतृत्वगुण व स्वयंसेवकत्वाची भावना अधिक दृढ झाली असून ग्रामविकासात युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे अधोरेखित झाले, अशी प्रतिक्रिया कोटमगावच्या सरपंच श्रीमती कीर्तीताई डगले यांनी व्यक्त केली